आडरानात टँकरमधुन पेट्रोल-डिझेलची चोरी करणारे सहा जण पोलिसांच्या ताब्यात


माळीवाडा येथे पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाची कारवाई
पोलिसांनी जप्त केला ४० लाख ११ हजारांचा मुद्देमाल

राष्ट्र सह्याद्री / प्रतिनिधी
औरंंगाबाद : पेट्रोल आणि डिझेलच्या टँकरचे सील तोडून त्यातून पेट्रोल व डिझेलची चोरी करून विक्री करणाऱ्या अड्यावर पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने छापा मारला. ही कारवाई बुधवारी (दि.२८) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख अब्दुल्ला शेख अहेमद (वय ४५, रा.लिपानी आडगाव), साजेद खॉन साहेब खॉन (वय ३०), इलियास खॉन आजम खॉन (वय ५४) दोघेही राहणार वैâसर कॉलनी, शेख जाहेद शेख हमीद शेख (वय २६, रा.बायजीपुरा), मुक्तार वजीर शेख (वय ४०, रा.बालानगर, पैठण), अश्फाक हुसेन भाई (४८, रा.लोटाकारंजा, सिटीचौक परिसर) असे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींची नावे आहेत.

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील जांभाळा गावाजवळ असलेल्या त्रिमुर्ती ढाब्याच्या पाठीमागे पेट्रोल व डिझेलच्या टँकरमधुन पेट्रोल व डिझेल चोरी करून त्याची अवैधरित्या विक्री होत असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांना मिळाली होती. पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, उपायुक्त मिना मकवाना, निकेश खाटमोडे पाटील, गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ. दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे सहाय्यक निरीक्षक राहुल रोडे, अनिल खरात, मनोज विखनकर, विठ्ठल आडे, विजय निकम, इमरान पठाण, सय्यद शकील, विनोदपवार आदींनी जांभाळा गावाजवळील त्रिमुर्ती ढाब्याच्या पाठीमागील पेट्रोल-डिझेलची अवैधरित्या विक्री करणाऱ्या अड्यावर छापा मारला. त्यावेळी टँकर क्रमांक (एमएच-२०-डीई-६१९५) मधुन अवैधरित्या डिझेल व पेट्रोल काढण्यात येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिसांनी पेट्रोल-डिझेलची अवैधरित्या चोरी करून विक्री करणाऱ्या सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून एक टँकर, स्कार्पीओ जीप क्रमांक (एमएच-१६-आर-५०२३), रिकामे ड्रम, प्लास्टीकच्या कॅन असा एकुण ४० लाख ११ हजार ५२३ रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून रात्री उशिरापर्यंत दौलताबाद पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here