कुरकुंभ औद्योगीक वसाहत परिसरात  40 मेंढयांना विषबाधा,17 मेंढ्यांचा मृत्यु

दौंड: तालुक्यातील पाटस येथील मेंढपाळांच्या चरण्यासाठी गेलेल्या तब्बल 40 बकऱ्यांना पाणी पिल्याने विषबाधा झाली आहे. त्यात 17 मेंढ्यांचा जागीच मृत्यु झाला आहे.

कुरकुंभ औद्योगीक वसाहती मधील कंपनीने रासायनिक युक्त सांडपाणी रस्त्यावर सोडल्याने व हे पाणी या बकरी पिल्याने विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित कंपनीवर त्वरीत कारवाई करावी अशी मागणी मेंढपाळांनी केली आहे.    

पाटस (मोटेवाडा ) येथील लक्ष्मण बरकडे, लालू आबा बकरके हे मेंढ्या चरण्यासाठी बुधवारी कुरकुंभ औदयोगीक परिसरातील मोकळ्या माळारानातील पटांगणात गेले होते. यावेळी दुपारी 50 ते 60 बकऱ्यांनी सांडपाणी पिल्याने 40 बकऱ्यांना विषबाधा झाली असून 17 बकऱ्या दगावल्या आहेत.

मीरा केमिकल कंपनी जवळ ही घटना घडली आहे, रस्त्यावर कंपनीचे रासायनिक युक्त दुषीत सांडपाणी सोडल्याने आणि हे पाणी बकरी पिल्याने त्यांना विषबाधा होवून त्यांचा मृत्यु झाला आहे. असे मेंढपाळाचे म्हणणे आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. दौंड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. प्रशासनाने संबंधित पंचनामा करावा, तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारांनी या रासायनिक युक्त सांडपाण्याची तपासणी करावी. संबंधित दोषी कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नुकसान ग्रस्त मेंढपाळांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here