नोकर भरती घोटाळ्याची चौकशी होणार: महसूलमंत्री थोरात यांचे संकेत

नगर: गेल्यावर्षी  राज्य सरकारच्या विविध पदांसाठी राबविण्यात आलेल्या भरती प्रक्रियेतील कथित अनियमितता किंवा घोटाळा प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे संकेत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मात्र सखोल चौकशीसाठी विशेष अन्वेषण टीम (एसआयटी) ची नेमणूक करण्याची मागणी केली. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करणारे नगरचे तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनाही समग्र शिक्षा अभयानाच्या राज्य प्रकल्प संचालक पदाची जबाबदारी दिली आहे. 

महापरीक्षा पोर्टल मार्फत करण्यात आलेल्या राज्य शासनाच्या वर्ग क आणि वर्ग ड च्या पदांवरील नेमणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा संशय आहे. जिल्हाधिकारी द्विवेदी यांना प्रथम याबाबत संशय आल्यानंतर त्यांनी तसा अहवाल शासनाला देऊन जिल्ह्यातील २३६ पदांची भरती थांबविली. त्यावर शासनाने अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील या नियुक्त्या आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात दिल्या जाण्याची शक्यता आहे. या बाबत दैनिक ‘राष्ट्र सह्याद्री’ने संपादकीय लेखातून प्रकाश टाकला होता. नगरसह राज्यातील ३४ जिल्ह्यात हि भरती झाली त्यात तक्रारी होऊनही नगर वगळता इतर जिल्ह्यात नेमणूका दिल्या गेल्या.

या प्रकरणात महाआयटीचे माजी निर्देशित संचालक कौस्तुभ ढवसे यांच्यासह यूएसटी ग्लोबल आणि आर्केअस इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्याही आता चौकशीच्या फेऱ्यात अडकल्या आहेत. ढवसे हे फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. ते फडणवीस याचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) होते. भाजप सरकार बरोबरच ते देखील पदावरून पायउतार झाले होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here