हडपसर परिसरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार ; दोघांना अटक


पुणे : आई सोबत झालेल्या किरकोळ भांडणानंतर घरातून बाहेर पडलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तिच्यावर चार जणांनी सामूहिक अत्याचार केला. 

मागील दोन दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. तरुणीने कसेबसे या नराधमांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेत पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मराठवाड्यातील एका छोट्याशा खेड्यातील आहे. लॉकडाऊनमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी कुटुंबियांसह ती पुणे शहरात आली होती. तिचे आई-वडील मोलमजूरीची कामे करतात. दरम्यान, २६ ऑक्टोबर रोजी या तरुणीचा आईसोबत वाद झाला आणि त्या रागातून तिने घर सोडले. यावेळी रस्त्यावर बसलेली असताना एका तरुणाने तुला गावी नेऊन सोडतो असे म्हणत तिला एका निर्जन ठिकाणी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.


त्या नराधमाच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेऊन हडपसर परिसरातील गाडीतळ याठिकाणी येऊन बसली. त्यावेळी आणखी एका व्यक्तीने तिला आपल्यासोबत भेकराई नगर येथे नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. ही दुसरी व्यक्ती तिला दुसऱ्या दिवशी बोपदेव घाटात घेऊन गेली आणि त्याने त्या ठिकाणी आपल्या आणखी दोन नातेवाईकांसह तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून पीडितेने जागरुक नागरिकाच्या मदतीने हडपसर पोलिस स्टेशन गाठले आणि घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला.

त्यानंतर हडपसर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. काही वेळातच दोन आरोपींना अटकही केली. अल्पवयीन मुलीवर अशाप्रकारे सामूहिक अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here