अर्भकाला जिवंत गाडण्याचा प्रयत्न


काळ आला होता पण वेळ आली नसल्याचा आला प्रत्यय; माणुसकीला काळीमा फासणारी घटना
 

राष्ट्र सह्याद्री / प्रतिनिधी
   पुरंदर : तालुक्यातील आंबोडी गावच्या हद्दीत एका  एक ते दोन दिवसा पूर्वी जन्मलेल्या  पुरुष जातीच्या अर्भकाला जिवंत गाडण्याचा प्रकार उघडकीस आला असून  गाडणारे युवक फरार झाले. त्यामळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.  परिसरातील शेतकऱ्यांच्या मुलांच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी ताबोडतोब तिकडे धाव घेतली. मात्र मुलांना पाहताच दोन अज्ञात व्यक्तींनी दुचाकीवरून पोबारा केला. पोलिसांनी त्या अर्भकास पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल केले आहे. मनोज अशोक रणपिसे, रा. आंबोडी यांनी याबाबत सासवड येथील पोलीस ठाण्यात घटनेची खबर दिली आहे.
     

याबाबत सविस्तर वृत्त असे की,  बुधवार दि. २८ रोजी आंबोडी गावच्या हद्दीतील गायरान जवळील वनखात्याच्या शेतात  ऋषिकेश विनायक रणपिसे, वय १७, यश विनायक रणपिसे, वय १४, आणि अविष्कार अशोक बोरकर, वय १८ हे तिघेजण शेतातील काम करीत असताना दुपारी दोन च्या सुमारास त्यांना एका लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्यामुळे त्यांनी त्या दिशेने धाव घेतली असता दोन अज्ञात युवक एका खड्ड्यात माती टाकताना आढळून आले त्यामुळे ते तिघेजण त्यांच्या जवळ जावू लागले, त्याचवेळी त्या मुलांना पाहून सदर युवकांनी दुचाकीवरून  पळ काढला . त्या खड्यात पहिले असता एक लहान बालक अर्धे गाडलेल्या अवस्थेत  दिसून आले. त्यामुळे या तिघांनी त्वरित त्यास खड्ड्यातून बाहेर काढले.
 

त्यानंतर त्यांच्या शेतापासून काही अंतरावर असलेल्या मनोज अशोक रणपिसे यांना फोन करून याबाबत माहिती दिली.   रणपिसे यांनी   सासवड येथील साकेत जगताप आणि युवराज बोरकर यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर त्यांनी सासवड पोलीस ठाण्याशी संपर्क केला असता पोलीस कर्मचाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेवून सदर अर्भकास ताब्यात घेतले. त्यास प्रथम जेजुरी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यानंतर पुणे येथील ससून रुग्णालयात पाठवून देण्यात आले. पोलीस निरीक्षक डी एस हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुनील चिखले हे  तपास करीत आहेत.
   

सदर अर्भक हे पुरुष जातीचे असून त्याची नाळही काढलेली नव्हती त्यास पीना लावलेल्या दिसून आल्या आहेत. दरम्यान बालक एकदम सुखरूप आहे.  संबंधित बालक अनैतिक संबंधातून जन्मलेले असल्याची शक्यता असून ते नकोसे असल्याने त्यास जिवंत गाडण्याचा प्रकार घडला असल्याचा अंदाज पोलीस निरीक्षक डी एस हाके यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here