मराठा समाजासाठी इतरांना वेठीस धरू नका- मंत्री विजय वडेट्टीवार


 मुंबई: मराठा आरक्षणाचा प्रश्न हा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर नोकरभरतीचा विषय लक्षात घेता केवळ एका समाजासाठी इतर समाजातील तरुणांना वेठीस धरू नये, अशी संतप्त प्रतिक्रिया मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. मराठा समाजाच्या जागा राखीव ठेवून इतर नोकरभरती सुरू करा.

ओबीसींसह इतर मुलांचे वय देखील वाढत चालले आहे. त्यामुळे नोकरभरती सुरू केली नाहीतर बहुजन समाजातील संताप अधिक वाढेल, असेही वडेट्टीवार म्हणाले.राष्ट्रीय ओबोसी महासंघाने तात्काळ नोकरभरती सुरू करावी अशी मागणी केलीआहे, यावर विचारण्यात आले असता विजय वडेट्टीवार म्हणाले की, “किती थांबायचं, किती या तरुणांच्या जीवाशी खेळ खेळायचा. किती तरुणांचे आयुष्य आम्ही आता उद्धवस्त करायचे? महाराष्ट्रात बहुसंख्य असलेले लोक आहेत.

मला कोणावरही अन्याय करायचा नाही. मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे नुकसान झाले पाहिजे, या मताचा मी नाही. पण आता न्यायालयाने ते थांबवले आहे. न्यायालयाचा निकाल कधी येईल, किती दिवसांत येईल याची आता किती वाट बघायची हा देखील एक विषय आहे. या सगळ्या परिस्थितीत आपण ८० टक्के विद्यार्थ्यांना वेठीस धरणे चुकीचे आहे”, अशी भावना वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.“यामध्ये आदिवासी आहेत, दलित, ओबीसी, वीजेएनटी, एसबीसी आहेत. हा केवढा मोठा वर्ग आहे. त्यांचे वय वाढत चालले आहे. मला वाटते की, जी काही राखीव जागा आहे ती बाजूला ठेवा आणि बाकीच्या भरत्या करा. नाहीतर ओबीसी समाजातील लोकांमध्ये जो असंतोष आहे तो उद्या रस्त्यावर आला तर खूप अडचण होईल. सगळ्यामध्येच असंतोष वाढेल. कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत इतर नोकर भरती सुरू करण्याची मागणी केली आहे. तातडीने यावर निर्णय घेण्याची विनंतीही मुख्यमंत्र्यांना केली आहे”, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
 

वडेट्टीवार यांच्या भूमिकेला दरेकर यांचा पाठींबा

मराठा आरक्षणाबाबतीत राज्य सरकारने संवेदनशीलपणे लक्ष घालण्याची गरज आहे. ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर नोकर भरतीत अन्याय होता कामा नये. तसेच मराठा आरक्षणाच्या राखीव जागा वगळता ओबीसीच्या जागा भरल्या गेल्या पाहिजेत. यामध्ये दोन्ही समाजाच्या प्रश्नांबाबत मधला मार्ग काढण्याची गरज आहे, अशी भूमिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मांडली आहे. दोन्ही समाजातील तरुणांना नोकऱ्यांची गरज आहे. त्यामुळे सरकारमधील एक मंत्री मराठा समाजाच्या राखीव जागा बाजूला ठेवून नोकरभरती सुरू करा,अशी मागणी करत असेल तर मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी, असेही दरेकरांनी नमूद केले.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here