श्रीगोंद्यात बोगस कांदा बियाणे “फॅक्टरीचा” पर्दाफाश


दादा सोनवणे । राष्ट्र सह्याद्री

श्रीगोंदा : तालुक्यातील मांडवगण येथे कृषी विभाग व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त छापा टाकून बोगस कांदा बियाणे कंपनी सुरू असल्याचे उघडकीस आणले. तेथे बेकायदेशीर पद्धतीने कांदा बियाणे साठवणुक, विना परवाना एका खाजगी कंपनीच्या पॅकिंग बॉक्समध्ये बोगस बियाणे भरून सीलबंद करुन विक्रीसाठी खाजगी विक्रेते व शेतकऱ्यांना वितरीत केले जात होते. पथकाने अमोल प्रकाश धबागडे  (मुळगाव- यवतमाळ, हल्ली मुक्काम-मांडवगण) याला ताब्यात घेऊन बियाणे अधिनियम १९६६ आणि बियाणे नियंत्रण आदेश १९८३ या कायद्यानुसार कारवाई करत गुन्हा दाखल करून त्याला श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात दिले.
             

याबाबत सविस्तर असे की, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना मांडवगण येथे जालना येथील विराट ऐग्रो इनपुट या कंपनीच्या कांदा बियानाच्या बॉक्स मध्ये बोगस कांदा बियाणे भरून त्याची खाजगी विक्रेते व शेतकऱ्यांना विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच कृषी विभाग व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तेथे छापा टाकून विराट ऐग्रो इनपुट या कंपनीच्या कांदा बियाण्याचे ५०० ग्रॅम वजनाचे  ८० बॉक्स , ७० किलो सुट्टे कांदा बियाणे, सिलीगं  मशीन, प्लास्टिकच्या रिकाम्या पिशव्या असा एकूण ३ लाख ५ हजार रुपये रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यवतमाळ येथील अमोल प्रकाश धबागडे याला ताब्यात घेऊन त्याच्यावर बियाणे अधिनियम १९६६ आणि बियाणे नियंत्रण आदेश १९८३ या कायद्यानुसार ही कारवाई करत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात दिले. तर जप्त बियाण्याचा नमुना पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येऊन कारवाई करण्यात येणार आहे. 

सध्या कांदा बियाण्यांची टंचाई सुरू आहे. त्यामुळे बोगस बियाण्यांच्या माध्यमातून मोठे रॅकेट सुरू असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकारात आरोपी अमोल धबागडे याला साथ देणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. 

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here