Police: पो. नि. संपत शिंदे यांची बदली नियमबाह्य असल्याची तक्रार;  

स्थानिक गुन्हेशाखा मिळवण्यासाठी नियोजनबद्ध योजना आखल्याचा दावा


राष्ट्र सह्याद्री । प्रतिनिधी
श्रीरामपूर – नुकतेच नाशिक परिमंडळातून अहमदनगर येथे बदलून आलेले पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांची बदली नियमबाह्य असल्याचा व केवळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत नियुक्ती मिळावी या उद्देशाने शिंदे यांनी आपली बदली नाशिकहुन अहमदनगर येथे करून घेतल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते तौफिक कलीम शेख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. त्यांनी आपल्या शेख यांनी म्हटले आहे की, पो. नि. संपत शिंदे हे नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील असून त्यांनी यापूर्वी जिल्ह्यात जवळपास ६.५ वर्ष विविध पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून काम केलेले आहे. पो. नि. संपत शिंदे यांनी जिल्ह्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून चार वर्ष व पोलीस निरीक्षक म्हणून अडीच वर्ष असे एकूण साडे सहा वर्ष जिल्ह्यात सेवा केली आहे. पोलीस खात्यात एका परिक्षेत्रात एकूण आठ वर्षांचा कालावधी ठरलेला असून एका जिल्ह्यात जास्तीत जास्त चार वर्ष एवढा कार्यकाळ ठरवून दिलेला असताना आज नव्याने झालेल्या बदल्यांमध्ये शिंदे यांची बदली अहमदनगर येथे करण्यात आली आहे. २०१९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिंदे यांची बदली अहमदनगर जिल्ह्यातून नाशिक जिल्ह्यात करण्यात आली होती. पो. नि.  शिंदे यांनी यापूर्वी नाशिक, नागपूर, बीड, औरंगाबाद व नांदेड येथे पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक ते पोलीस निरीक्षक अशी नोकरी केलेली आहे. दरम्यान सध्या पोलीस महासंचालक यांनी नव्याने केलेल्या बदल्यांमध्ये शिंदे यांची बदली नियमबाह्य असल्याचे दिसून येत असून दीड वर्षांपूर्वी नाशिक येथे बदली झालेले शिंदे यांनी नाशिक परिमंडळात किमान तीन वर्ष सेवा पूर्ण करणे अपेक्षित होते परंतु त्यांनी नाशिक परिमंडळातील त्यांचा कार्यकाळ पूर्ण होऊ न देता केलेल्या बदलीमागे काय गौडबंगाल आहे हे त्यानांच माहित असेही तौफिक शेख यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. यापूर्वी पो. नि. संपत शिंदे यांचा जिल्ह्यातील कार्यकाळ हा वादग्रस्त ठरलेला आहे. श्रीरामपूरला असताना त्यांनी पक्षपातीपणे काम केल्याचा आरोप त्यांचेवर करण्यात आला आहे त्यामुळे केवळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत येण्यासाठीच शिंदे यांनी आपली बदली करून घेतली असल्याचे शेख यांनी म्हटले आहे.        

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here