पालिकेने 33 कोटींचे केलेले रस्ते निकृष्ट

राष्ट्र सह्याद्री / प्रतिनिधी

श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपालिका मार्फत शहरात ३३ कोटी रुपये खर्चून साधारण १७ रस्त्यांचे काम करण्यात आले आहे. मात्र, सदरील रस्त्यांच्या दर्जा आणि गुणवत्तेवर अनेकांकडून प्रश्न उपस्थित होत असून, याची सध्य स्थिती सामान्य माणसांना पाहण्यास मिळत आहे.

सविस्तर असे की, श्रीगोंदा शहरातील सतरा रस्त्यांपैकी एक श्रीगोंदा शहर ते पारगाव रोड या रोडची दुर्दशा झालेली दिसत आहे. आज संध्याकाळी याबाबत नमूद ठिकाणी श्रीगोंदा एसटी आगाराची एक मालवाहतूक बस श्रीगोंदा नगरपालिका मार्फत बनवण्यात आलेल्या रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये मधोमध फसल्याने येण्या-जाणाऱ्या वाहनांना मोठी कसरत करावी लागत आहे.

तालुक्यातील आसपास परिसरात असणारे साखर कारखाने चालू झाल्याने, ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर आणि ट्रक अशा परिस्थितीत या ठिकाणाहून वाहतूक करणे दुर्घटनेला आमंत्रण असल्याचे बोलले जात आहे. याबाबत काही स्थानिक कार्यकर्त्यांनी माध्यमांना कळवले असून, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सदरील एसटी फसली असल्याबाबत महामंडळाचे अधिकारी प्रवीण शिंदे यांना फोन करण्याचा प्रयत्न केला असता, ते फोन उचलत नाहीत.

अशा पद्धतीने या ठिकाणी रस्त्यात पडलेले खड्डे व त्यामध्ये फसलेल्या वाहनांमुळे दुर्घटनेची शक्यता स्थानिक नागरिक वर्तवत आहेत. याचबरोबर श्रीगोंदा नगरपालिकेने खर्ची घातलेले कोट्यावधी रुपये या खड्ड्यांमध्ये गेल्याचीही कार्यकर्ते बोलत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here