मुंबईत आजपासून ‘मराठा जोडो मोर्चा’

मुंबई : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने आक्रमक झालेल्या मराठा समाजाने मुंबईत आजपासून ‘मराठा जोडो मोर्चा’ला  सुरुवात केली आहे.

मुंबईतल्या लालबाग, कुर्ला ,घाटकोपर पूर्व, कांजुरमार्ग, भांडुप अशा भागातून समन्वयकांच्या गाड्या फिरवण्यात येणार आहे. या परिसरातील मराठा बांधवांना मराठा आरक्षणाच्या संदर्भात सध्या असलेल्या परिस्थितीची माहिती देणे, विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करणे, अशा पद्धतीचे कार्य या माध्यमातून केले जात आहे. त्याचबरोबर पंढरपूर येथून निघालेल्या दिंडीला समर्थन देण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. दिंडी मुंबईत दाखल झाल्यावर त्या ठिकाणाहून दिंडीत सहभागी होणे, अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना आणि तरुणांना दिल्या जाणार आहेत. आज मराठा जोडो मोर्चा लालबागच्या भारत माता सिनेमा येथून सुरू झाला आणि ठाणे येथे संपवण्यात आला आहे.

पुढच्या रविवारी हा मोर्चा मुंबईच्या पश्चिम भागांमध्ये घेतला जाणार आहे. त्याच्या पुढच्या रविवारी वसई-विरार या भागापर्यंत हा मोर्चा जनजागृती करेल आणि अंतिमतः पंढरपुरात निघालेली दिंडी मुंबईत दाखल झाल्यावर तिच्यामध्ये विसर्जित होईल.

राज्य सरकारने सध्या सर्वोच्च न्यायालयात घेतलेल्या भूमिकेबद्दल लोकांमध्ये जनजागृती करणे, सध्या समाजात असलेली संभ्रमावस्था दूर करणे, त्याचबरोबर सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, अशा कामाच्या माध्यमातून मराठा बांधवांना एकत्रित जोडण्याचं काम मराठा जोडो मोर्चा करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here