बेळगाव सीमाभाग लवकरच महाराष्ट्रात ; जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा आशावाद

सांगली: ‘महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमावाद सुप्रीम कोर्टात असतानाही कर्नाटक सरकारकडून सीमाभागातील मराठी भाषिकांवर अन्याय होत आहे. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र सरकारच्या सर्व मंत्र्यांनी काळ्या फिती बांधून काम केले. संपूर्ण महाराष्ट्र सीमाभागातील मराठी भाषिकांसोबत आहे. लवकरच बेळगाव सीमाभाग महाराष्ट्रात सामील होईल,’ असा विश्वास जलसंपदा मंत्री  जयंत पाटील यांनी व्यक्त केला. 

दरवर्षी एक नोव्हेंबरला कर्नाटक सरकार विजय दिवस साजरा करते. याच पार्श्वभूमीवर सीमाभागातील मराठी भाषिक काळा दिवस साजरा करतात. कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर होणाऱ्या दडपशाहीच्या विरोधात मराठी भाषिक रस्त्यावर उतरत काळा दिवस साजरा करतात. याच दिवशी बेळगावमध्ये मराठी भाषिकांचा भव्य मेळावादेखील होतो. सीमाभागातील मराठी भाषिकांची चौथी पिढी महाराष्ट्रात सामील होण्यासाठी लढा देत आहे. सीमावासियांना पाठिंबा देण्यासाठी राज्य सरकारने एक नोव्हेंबरला काळ्या फिती बांधून काम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार रविवारी राज्य सरकारमधील सर्व मंत्री काळ्या फिती बांधून काम करीत आहेत, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. 

‘सीमाभागातील मराठी भाषिक महाराष्ट्रात सामील होण्यावर ठाम आहेत. गेल्या ६० वर्षांपासून या एकाच मागणीसाठी त्यांची लढाई सुरू आहे. सीमावाद सुप्रीम कोर्टात असतानाही कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर अन्याय केला जातो. मराठी भाषिकांवर दडपशाही केली जाते. महाराष्ट्र सरकार आणि संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिक यांच्यासोबत आहेत. लवकरच सीमाभाग महाराष्ट्रात सामील होईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. 

उदय सामंत यांच्याकडून कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचा निषेध 

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी चंद्र, सूर्य असेपर्यंत बेळगाव कर्नाटकमध्येच राहील, असे वक्तव्य केले होते. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या वक्तव्याचा निषेध करीत, एक नोव्हेंबरला महाराष्ट्रातील नागरिकांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेश बंदी करण्यावर आक्षेप घेतला. 

रुपाली चाकणकर यांचा गनिमीकावा  

बेळगावात मराठी भाषिकांच्या निषेध मेळाव्याला जाण्यास कर्नाटक पोलिसांकडून बंदी घातली असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर अक्षरश: गनिमी काव्यानं रिक्षा प्रवास करून मराठी भाषिकांच्या मेळाव्यात दाखल झाल्या. यावेळी कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मराठा बांधवांच्या कार्यक्रमस्थळी गोंधळ घातला. या कन्नड कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या वतीने मंगेश चिवटे देखील मेळाव्याला गेले.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here