कमीन्सच्या कामगिरीने कोलकाता विजयी

    डॉ. अनिल पावशेकर

दुबईत खेळल्या गेलेल्या कोलकाता विरूद्ध राजस्थान सामन्यात पॅट कमीन्सच्या घातक गोलंदाजीने कोलकाता संघाचा एकतर्फी विजय झाला. रॉबीन उथप्पा, बेन स्ट्रोक्स, स्टिव्ह स्मिथ आणि संजू सॅमसन सारख्या धुरंधर फलंदाजांना स्थिर व्हायच्या आतच कमीन्सने बाहेरचा रस्ता दाखवल्याने राजस्थान संघाला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. १९१ धावांचे आव्हान स्विकारतांना राजस्थान संघाला ‘फलंदाजीतील अनावश्यक घाई नडली’ आणि तिथेच त्यांचा पराभव निश्चित झाला होता.

दवबिंदूची भुताटकी लक्षात घेता राजस्थान कर्णधार स्मिथने पहिले गोलंदाजी घेतली परंतू त्यासाठी त्यांना कोलकाता संघाला मर्यादित धावसंख्येत रोखणे जरुरी होते. यासाठी जोफ्रा आर्चरने नितिश राणाला भोपळा न फोडताच बाद सुद्धा केले. मात्र यानंतर व शुभमन गिल आणि राहुल त्रिपाठीने दमदार फलंदाजी करत कोलकाता संघाला सावरले. या दोघां व्यतिरिक्त सुनील नरेन आणि दिनेश कार्तिक फारशी चमक न दाखवता बाद झाले. मात्र खेळपट्टीवर रसेल आणि कमीन्सने कर्णधार इऑन मॉर्गनला सुंदर साथ देत चौफेर फटकेबाजी केली आणि कोलकाता संघाला १९१ पर्यंत पोहचवले.

एकदा धावसंख्या दोनशेच्या आसपास पोहचली की पाठलाग करणाऱ्या संघावर दडपण येणारच. मात्र त्यासाठी चांगल्या भागीदारी सोबतच हातात विकेट असणे तितकेच जरूरी असते. सोबतच धावगती आवाक्यात राखणे म्हणजे एकप्रकारे दिव्यच असते. खरे पाहता नाईट रायडर्सच्या ताफ्यात पॅट कमीन्स वगळता लगेच आठवतील असे नावाजलेले गोलंदाज सुद्धा नाहीत. पॅट कमीन्सची कामगिरी सुद्धा या सामन्यापुर्वी ‘कभी खुशी कभी गम’ राहीली होती. तर दुसरीकडे राजस्थान संघ बेन स्ट्रोक्सच्या रॉयल फलंदाजीने चांगलाच मजबूत झाला होता परंतु या सामन्यात नियती कोलकाताच्या प्रेमात पडली आणि राजस्थान संघाचे स्वप्न धुळीस मिळाले.

राजस्थानचे सलामीवीर राॅबिन उथप्पा आणि बेन स्ट्रोक्सने कमीन्सच्या पहिल्याच षटकात त्याच्यावर हल्ला चढवला परंतु त्यानेही ‘शेरास सव्वाशेर’ ठरत उथप्पाला सहाव्या चेंडूवर बाद करत सामन्यात पुढे काय लिहून ठेवले आहे याची पुसटशी कल्पना दिली. तिसऱ्या षटकात कमीन्सला ठोकण्याच्या नादात बेन स्ट्रोक्सचा उडालेला वेगवान झेल दिनेश कार्तिकने डावीकडे उंच झेपावत टिपला आणि कोलकाता संघाचा अर्धा विजय इथेच झाला होता. कारण बेन स्ट्रोक्सचा झंझावात पाहता तो कधीही सामना फिरवू शकला असता.
दोन महत्वाचे बळी गाठीशी लागताच मानवी रक्ताची चटक लागलेल्या नरभक्षक वाघासारखे कमीन्सला चेव आला आणि त्याच षटकात कर्णधार स्मिथला बाद करत त्याने राजस्थानच्या ‘जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले’. तर दुसऱ्या टोकाला शिवम मावीने संजू सॅमसनला माघारी पाठवत राजस्थानची स्थिती ४ बाद ३२ धावा अशी केविलवाणी करून टाकली होती.

तरीपण राजस्थानच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी त्यांच्याकडे जोस बटलर, रेहान पराग, चमत्कारी राहूल तेवटीया आणि जोफ्रा आर्चर अजूनही उपस्थित होते.
मात्र कमीन्स राजस्थानच्या मुळावर उठल्यासारखा गोलंदाजी करत होता. आपल्या अखेरच्या षटकात त्याने रेहान परागला बाऊंसरवर बाद करत आपले ४ बळी पुर्ण केले. तर जोस बटलर आणि राजेश तेवटीया वरून चक्रवर्तीच्या फिरकीला फसले. ‘टॉप आणि मिडल ऑर्डरने फलंदाजीत जोहार करताच’ राजस्थानचा पराभव अटळ होता. शेवटी निर्धारित २० षटकात अवघ्या १३१ धावा करत राजस्थानची धडपड संपली आणि कोलकाता संघाने प्लेऑफ करीता एक पाऊल पुढे टाकले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here