पालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी बोनस जाहीर

मुंबई : पालिका कर्मचार्‍यांना दिवाळीसाठी यावर्षी 15 हजार 500 रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. याबाबत सोमवारी महापौर किशोरी पेडणेकर यांनी घोषणा केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 500 रुपये वाढीव देण्यात आले आहेत. यामुळे पालिकेच्या सुमारे 1 लाख 11 हजार कर्मचार्‍यांची दिवाळी गोड झाली आहे.

यावर्षी कोरोनाचा प्रभावामुळे बोनसबाबत काय होणार असा प्रश्न कर्मचार्‍यांना पडला होता. त्यामुळे कर्मचारी संघटना समन्वय समितीनेही पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत महापौर किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यासह समन्वय समितीची महत्त्वपूर्ण बैठकही झाली होती.

कोविड काळात आपला जीव धोक्यात घालून इतरांसाठी काम करणार्‍या कामगारांना हक्काचे सानुग्रह अनुदान मिळायलाच हवे अशी भूमिका यावेळी मांडली होती.

या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सोमवार समन्वय समितीसोबत पालिकेच्या झालेल्या निर्णायक चर्चेनंतर महापौरांनी 15500 रुपये बोनस दिला जाणार असल्याचे जाहीर केले. दरम्यान, सानुग्रह अनुदान देण्यासाठी पालिकेवर 153.14 कोटींचा बोजा पडणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here