भेटवस्तू स्वीकारल्यास महापालिका अधिकाऱ्यांवर शिस्तभंग कारवाई

राष्ट्र सह्याद्री / प्रतिनिधी 
पिंपरी : दिवाळी सण जवळ आल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोणाकडूनही कसलीही भेटवस्तू स्वीकारता येणार नाही. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पालिका भवनमध्ये व आवारात कोणाकडूनही भेटवस्तू स्वीकारू नये. तसेच त्यांच्या कुटुंबियांनीही भेटवस्तू स्वीकारू नये असे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सक्त ताकीद दिली आहे.
अशा प्रकारे भेटवस्तू घेताना आढळल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.
महापालिका भवनमध्ये शहरातून विविध नागरिक येत असतात. कामानिमित्त महापालिकेतील विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांशी त्यांचा संबंध येत असतो. त्यामुळे आपले हितसंबंध जोपासण्यासाठी, तसेच प्रेमापोटी अनेक नागरिक भेटवस्तू देत असतात.
सणाच्या पार्श्‍वभूमीवर पालिकेतील बांधकाम परवाना, लेखा विभाग, स्थापत्य विभाग, पाणीपुरवठा विभाग यामध्ये भेटवस्तू येण्याचे प्रमाण जास्त असते. मात्र कोणत्याही व्यक्ती कडून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेटवस्तू स्वीकारणे लोकाभिमुख प्रशासन व्यवस्थेसाठी बाधक आहे. त्यामुळे अशा भेटवस्तू पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वीकारू नये. अन्यथा संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल अशी ताकीद आयुक्त हर्डीकर यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here