देऊळ बंदच… पिक्चर सुरू!

आजपासून राज्यातील चित्रपटगृहं, नाट्यगृहं, मल्टिप्लेक्स सुरू,
५० टक्के आसनक्षमतेची मर्यादा
जलतरण तलाव, योगावर्ग व इनडोअर स्पोर्ट्सनाही परवानगी
शाळा आणि मंदिरांबाबत मात्र अद्याप निर्णय नाही

मुंबईः दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कला व मनोरंजन क्षेत्राला दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला. राज्यातील चित्रपटगृहं, नाट्यगृहं आणि मल्टिप्लेक्स ५० टक्के क्षमतेसह आजपासून (५ नोव्हेंबर) सुरु होणार आहेत. करोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर असलेल्या सगळ्या थिएटर्सना, नाट्यगृहांना आणि मल्टिप्लेक्सना ही संमती देण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंधित क्षेत्र अर्थात कंटेन्मेंट झोन वगळता जलतरण तलावही उघडण्यास संमती देण्यात आली आहे. शाळा आणि मंदिरांबाबत मात्र अद्याप अधिकृत कुठलीही घोषणा झालेली नाही. त्यामुळे देऊळ बंदच पण पिक्चर सुरू… अशा स्वरुपाची मिश्किल टिपण्णी राजकीय विश्लेषकांकडून ऐकायला मिळाली.

राज्य शासनाच्या या निर्णयामुळे सिनेमा हॉल्स, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहं एकूण प्रेक्षक क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांसह उद्यापासून सुरु होणार आहेत. याच सोबत करोना प्रतिबंधित क्षेत्र अर्थात कंटेन्मेंट झोनच्या बाहेर असलेल्या योगा इन्स्टिट्युट आणि इन डोअर स्पोर्ट्सनाही संमती देण्यात आली आहे.

थिएटर्स सुरु करण्यात येणार असले तरीही कोरोना संदर्भातले सुरक्षेचे सगळे नियम पाळणं बंधनकारक असणार आहे. अनलॉक पाचमध्ये ठाकरे सरकारने हॉटेल आणि रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेसह सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आठ महिन्यांपासून बंद असलेली थिएटर्स, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहं उद्यापासून उघडणार आहेत. त्यामुळे थिएटर्स मालक आणि कलाकार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here