शेतकऱ्यांची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

संगमनेर: तालुक्यातील करुले येथील एका शेतकऱ्याने घरानजीकच्या विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यू ची नोंद केली आहे.

विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव दिलीप अर्जुन कोल्हे ( वय ४८ वर्षे ) असे असून, आज बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली
करुले येथील शेतकरी दिलीप कोल्हे हे बुधवारी पहाटे पासून पाच वाजेपासून राहत्या घरातून बाहेर पडले होते. स्वताच्या घराजवळील विहीरीत उडी घेत त्यांनी आत्महत्या केली. ते घरात आढळून न आल्याने कुटुंबियांनी त्यांची शोधाशोध सुरु केली असता, दुपारी दीड वाजेच्या सुमारास दिलीप कोल्हे यांचा मृतदेह घराजवळील विहीरीत आढळून आला. पोलीस पाटील अशोक कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते सुनील उकिर्डे व विजय कोल्हे यांच्या मदतीने पोलिसांनी लोखंडी गळाच्या सहाय्याने मृतदेह विहिरीतील पाण्यातून बाहेर काढला व उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविला.

याप्रकरणी मयताचा भाऊ सतिश अर्जुन कोल्हे यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत दिलीप कोल्हे यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. दिलीप कोल्हे यांच्यावर फायनान्सचे कर्ज होते. असे समजते त्याबरोबरच शेतातील नापीकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून दिलीप कोल्हे यांनी आत्महत्या केल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले. शेतकरी आत्महत्येच्या सदर घटनेने पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली आहे.
   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here