‘चमकोगिरी’ करण्यापेक्षा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई  द्यावी – झावरे 

राष्ट्र सह्याद्री / प्रतिनिधी 

टाकळी ढोकेश्वर -अतिवृष्टी झालेल्या नगर जिल्ह्यातील 13 तालुक्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाईचे पैसे जमा झाले मात्र,पारनेर तालुक्यात अद्याप छदामही मिळाला नसल्याची खंत व्यक्त करताना अशा संकटाच्या काळात लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे असते असे सांगत तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी चमकोगिरी करण्यापेक्षा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन मदत करावी. तुम्ही कोणाच्या विमानात बसता यापेक्षा जनतेला तुम्ही किती मदत करता हे महत्त्वाचे असल्याची टीका जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी आमदार निलेश लंके यांचे नाव न घेता केली .

तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथील सुमारे एक कोटी रुपयांच्या व्यापारी संकुलाचे भूमिपूजन आज झावरे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी दूध संघाचे अध्यक्ष राहुल पाटील शिंदे होते सरपंच पंकज कारखिले व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुजित पाटील झावरे म्हणाले की या वर्षी झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. ऊस, कांदा ,डाळिंब, सीताफळ ही पिके देखील वाया गेली आहे.शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे धोरण घेतले आहे. मात्र, तालुक्यातील पळशी मंडल वगळता इतर ठिकाणीच्या कोणत्याही मंडलामध्ये पंचनामेच झाले नाहीत,तर मदत काय मिळणार?असा सवालही सुजित झावरे यांनी केला.

लोकप्रतिनिधी हे लोकांसाठी असतात पक्षासाठी नाही. त्यामुळे अडचणीच्या काळात जनतेला मदत करणे ही त्यांची जबाबदारी आहे. तुम्ही कोणाच्या विमानात बसता याचे जनतेला काही देणेघेणे नसल्याची टीका करतानाच हे नव्याचे नवेपण असल्याचेही त्यांनी सांगितले.तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे होऊन त्यांना नुकसान भरपाई व पीक विमा मिळणे गरजेचे आहे.परंतु ही गोष्ट होत नसल्याचे खंत व्यक्त करीत हे तालुक्याचे दुर्दैवच असल्याचेही झावरे पाटील यांनी सांगितले. 
रांजणगाव गणपती येथील एमआयडीसीमधील विषारी रसायन पारनेर तालुक्यातील देवीभोयरे व जवळा या परिसरातील कॅनॉलच्या ओढयाखाली मध्यरात्री टॅंकर मधून ओतून देत असल्याने त्याचा पिकांवर घातक परिणाम होत आहे. यामधेही मोठ्या लोकांचे हितसंबंध असल्याचा आरोप करीत या संदर्भातही लवकरच जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देणार असल्याचे सुजित पाटील झावरे यांनी सांगितले.

 या विषयी काय म्हणाले  सुजित झावरे पाटील   
” गेल्या 40 वर्षांपूर्वी माझे वडील माजी आमदार स्वर्गीय वसंतराव झावरे यांनी शिक्षण संस्था काढली.  परंतु सगळेच मला पाहिजे या भूमिकेतून लोकप्रतिनिधींनी या संस्थेत शिरकाव करण्याचा प्रयत्न केला .हे नियतीला देखील मान्य राहणार नाही. या संदर्भात न्यायालयीन लढा सुरू असून न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here