अवैध धंदे आढळल्यास पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार – पाटील

नेवासा फाटा (प्रतिनिधी) – ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरु असल्याचे आढळून येईल अथवा तक्रारी येतील त्या पोलीस अधिकाऱ्यांसह संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा निर्वाणीचा खणखणीत इशारा अहमदनगरचे पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी दिला आहे. बुधवारी श्री.पाटील यांनी नेवासा पोलीस ठाण्याला अचानक भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली, त्याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना त्यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे.

अहमदनगरचे नुतन पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी बुधवारी नेवासा पोलीस ठाण्याला भेट देऊन तपासणी केली. यावेळी त्यांनी या पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कामकाजाची सविस्तर माहिती घेतली. तालुक्यातील गुन्हेगारी व केलेल्या उपाययोजना त्यांनी समजावून घेत संबंधितांना कामकाजाबाबत सूचनाही केल्या. कुणाचेही गैरवर्तन कदापीही खपवून घेतले जाणार नसल्याचे श्री. पाटील यांनी यावेळी स्पष्ट करुन कर्तव्यात कसूर होणार नाही याची कटाक्षाने दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले. काम करताना पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी त्यांनी ‘शॉर्टकट’ मार्गांचा अवलंब न करता थेट संपर्क साधून मांडल्यास त्यात स्वतः लक्ष घालून सोडविण्याचे आश्वासन यावेळी श्री.पाटील यांनी दिले.

कर्तव्यदक्ष म्हणून संपूर्ण पोलीस दलात सुपरिचित
‘ते आले, त्यांनी पाहिले, त्यांनी जिंकले…’ –
अहमदनगरचे नुतन पोलीस अधिक्षक करड्या शिस्तीचे आणि कर्तव्यदक्ष म्हणून संपूर्ण पोलीस दलात सुपरिचित आहेत. त्यांनी पोलीस अधिक्षक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच नेवासा पोलीस ठाण्याला भेट देणार असल्याने या पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी ‘टाईटफिट’ त्यांच्या स्वागतासाठी सज्ज होते. नुकत्याच व्हायरल झालेल्या ‘ऑडीओ क्लीप बाँब’चे ‘टेन्शन सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते. मात्र श्री.पाटील यांनी त्यांच्या बोलण्यातून कामकाजाबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांत जरबही निर्माण केली आणि आपुलकीही. त्यामुळे कालची त्यांची भेट ही, ‘ते आले, त्यांनी पाहिले, त्यांनी जिंकले…’ अशी राहिली.

‘नो कॉमेंट’ –
पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी यावेळी उपस्थित पत्रकारांशी मनमोकळा वार्तालाप केला. मात्र यादरम्यान नेवासा पोलीस ठाण्याचा निलंबित पोलीस कॉन्स्टेबल संभाजी गर्जे आणि तडकाफडकी बदली करण्यात आलेले अप्पर पोलीस अधिक्षक दत्ताराम राठोड यांच्यातील संभाषणाच्या ऑडीओ क्लीपबाबत पत्रकारांनी त्यांना छेडले असता अचानक गंभीर होत त्यांनी याप्रकरणी कायदेशीर चौकशी प्रक्रिया सुरु असल्याने सध्या या विषयावर मी काहीच बोलू शकत नसल्याचे स्पष्ट करुन आवरते घेतल्याने सर्वांचाच हिरमोड झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here