राजकिय स्वार्थ साधताच पडला आरक्षण लढ्याचा विसर 

प्रतिनिधी /  राष्ट्र सह्याद्री 
इंदापूर : धनगर समाजाचा आरक्षण लढा सातत्याने सुरू असून त्याला समाजातील राजकिय नेत्यांच्या स्वार्थी भूमिकेमुळे व दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यामुळे यश येत नसल्याचा आरोप धनगर समाज्याचे युवा नेते व राष्ट्रवादी युवक काँगेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विशाल मारकड यांनी केला आहे.       
धनगर समाजातील अनेक नेत्यांनी आरक्षणावरून रणकंद माजविले मोर्चे काढले समाजानेही उस्फुर्त प्रतिसाद देत आरक्षण लढा तीव्र केला. मात्र या आंदोलनाने सरकारवरील दबाव वाढताच नेतेमंडळीना राजकिय आमिष दावत आंदोलनातील हवा काढून घेण्याचे काम सत्ताधारी करत असल्याचे समोर आले आहे. आशा आमिषाला बळी पडून राजकिय खुर्ची मिळताच आरक्षणाचा विसर नेत्यांना पडत असल्याने आरक्षण मिळत नसल्याचे स्पष्ट मत मारकड यांनी व्यक्त केले आहे.   
पुढे बोलताना विशाल मारकड म्हणाले, २०१४ च्या निवडणूकी पूर्वी राज्यात धनगर आरक्षण प्रश्न चांगलाच पेटला होता. राज्यातील धनगर युवक आक्रमक झाले होते. शांततेच्या मार्गाने आरक्षण लढा तीव्र होत असताना पंढरपूर ते बारामती काढलेल्या पायी दिंडीला राज्यातून समाज बांधव उपस्थित होते. भाजपच्या वतीने तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी समारोपाला बारामतीत येऊन भाजपची सत्ता येताच पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर आरक्षण देऊ असे जाहीर केले. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शब्दांमुळे राज्यातील धनगर नेत्यांनी भाजपला मदत करण्याचे जाहीर केले.
धनगर समाज्याच्या मतावर राज्यात सत्तांतर झाले. भाजप शिवसेनेचे सरकार आले. मात्र धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षण देऊ म्हणणारे देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या कॅबिनेट मिटिंग पर्यंत सुध्दा आरक्षण दिले नाही. त्यामुळे भाजप मधील धनगर समाजाच्या नेत्यांनी त्यांच्या विरोधात शब्द काढला नाही. भाजपकडून मिळालेल्या राजकीय खुर्चीवर धन्यता मानली. आता मात्र सत्ता जातच त्यांना जाग आली आहे.
भाजप सरकारने धनगर समाजासाठी एक हजार कोटींची तरतूद केली असल्याचे आवर्जून सांगतात मात्र जर खरेच भाजपला धनगर समाजाची तळमळ होती तर पहिल्या कॅबिनेट मिटिंग मध्ये आरक्षण देण्यास तांत्रिक अडचण समोर येत होती तर आरक्षण मिळे पर्यंत  आदिवासी समजाला लागू होत असलेल्या योजना धनगर समाजाला लागू करण्यासाठी एक हजार कोटींची प्रत्येक वर्षी तरतूद  करायला काय अडचण होती असा सवाल मारकड यांनी उपस्थित केला आहे. मात्र भाजप हे धनगर समाजा विषयी पुतना मावशीचे प्रेम दाखवत आहे. त्यामुळे भाजपा धनगर समाज्याच्या नेत्यांनी समाज्याची दिशाभूल करू नये असे आवाहन विशाल मारकड यांनी केले आहे.       
शरद पवार हे धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध  करत असल्याचे भाजपा नेते ओरडून सांगत आहेत. मात्र कायद्याच्या चौकटीत बसवून आरक्षण देण्यासाठी शरद पवार अजित पवार यांना धनगर समाजाचे आम्ही कार्यकर्ते राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व नाना देवकाते पाटील यांना बरोबर घेऊन लवकरच भेटणार असल्याचे मारकड यांनी शेवटी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here