कोरोना काळात सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावले 

शेवगाव प्रतिनीधी – कोरोना काळात मोदी सरकारने शेतक-यांना मदत करण्याऐवजी त्यांना देशोधडीला लावण्याचे धोरण घेतले आहे. अतीवृष्टीने झालेली नुकसान भरपाई विम्याच्या जोखीम रकमेइतकी मिळावी अशी मागणी भाकपचे राज्य सहसचिव अॅड. सुभाष लांडे यांनी केली आहे.
अखिल भारतीय किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शेवगाव येथे विविध मागण्यांसाठी शहरातील क्रांतीचौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या वेळी अड. लांडे बोलत होते.

अॅड. सुभाष लांडे, ज्येष्ठ कार्यकर्ते शशिकांत कुलकर्णी, किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष बापुराव राशिनकर, संजय नांगरे, बाजार समितीचे संचालक अशोक नजन, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्तात्रय फुंदे, प्रशांत भराट, बाळासाहेब फटांगडे, आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आजच्या आंदोलनात देशभरात ३०० हून अधिक शेतकरी संघटना सहभागी झाल्या होत्या अशी माहिती अॅड. लांडे यांनी दिली.

अॅड. लांडे म्हणाले, शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात अनेक महिन्यांपासून शेतकरी संघटना व डावे पक्ष आंदोलन करीत आहेत. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी डावलून कंत्राटी व कार्पोरेट शेतीला फायदा होईल अशी धोरणे केंद्र सरकार राबवित असून हमी भावाने शेतमाल खरेदी करण्याच्या विरोधात ती आहेत. त्यामुळे बाजार समित्या बंद पडणार आहेत. परतीच्या पावसात हाता तोंडाशी आलेल्या सोयाबीन, भात, कपाशी, भुईमुग, डाळी , द्राक्षे कुजून गेले. याबाबत गुंठ्याला १०० रूपये नुकसान भरपाई दिली जात आहे. ही शेतक-यांची थट्टा आहे. केंद्र सरकार विजेच्या दराबाबत नवे धोरण आणत असून कृषी वापर व व्यापारी वापर यात वीजेचा दर एकच असल्याने ते शेतक-यांसाठी व जनतेसाठी अन्यायकारक ठरणार आहे.
शेतकरी संघटना समन्वय समितीद्वारे आज चक्का जाम आंदोलन करण्यात आले. २६ नोव्हेंबर रोजी देशव्यापी आंदोलन करण्यात येईल असा इशारा अॅड. लांडे यांनी या वेळी दिला.

या वेळी झालेल्या आंदोलनात आत्माराम देवढे, मच्छिंद्र आर्ले, दीपक बढे, कडूमिया पठाण, संतोष गायकवाड, कारभारी वीर, राजू पोटफोडे, शिवाजी भुसारी, वैभव शिंदे, अविनाश गायकवाड आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here