…आता १२ची गाडी निघाली

महाविकास आघाडीकडून यादी राज्यपालांना सुपूर्द 

मुंबई: राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांच्या निवडीवरून गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला घोळ अखेर थांबला. नाही, हो करत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे १२ नावावर एकमत झाले.  राज्यपालांकडून विधान परिषदेत नियुक्त करण्यात येणाऱ्या सदस्यांसाठी १२ जणांच्या नावांची यादी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपवण्यात आली. १२ सदस्यांच्या नावावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय झाल्यानंतर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन यादी सुपूर्द केली. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेकडून प्रत्येकी चार जणांची शिफारस करण्यात आली आहे. डावललेल्या सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांचा मात्र हिरमोड झाला. 

मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर आज महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. सायंकाळी ६ वाजता अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री अनिल परब आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. तिन्ही मंत्र्यांनी राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेवर पाठवायच्या उमेदवारांची यादी राज्यपालांकडे सोपवली.

काँग्रेसकडून

 सचिन सावंत
 रजनी पाटील
 मुजफ्फर हुसैन
 अनिरुद्ध वणकर  – कला

राष्ट्रवादी काँग्रेसकडून

 एकनाथ खडसे
 राजू शेट्टी
 यशपाल भिंगे – साहित्य
 आनंद शिंदे – कला

शिवसेना उमेदवार

 उर्मिला मातोंडकर
 नितीन बानगुडे पाटील
 विजय करंजकर
 चंद्रकांत रघुवंशी

“राज्यपाल ‘या’ यादीवर शिक्कामोर्तब करतील”

परिवहन मंत्री अनिल परब यांनी ही यादी लवकरात लवकर मंजूर होईल असा विश्वास व्यक्त केला. “राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी यादी राज्यपालांना दिली आहे. मुख्यमंत्र्यांचं पत्र आणि मंत्रिमंडळ ठराव यासह कायदेशीर बाबी नमूद करुन राज्यपालांना विनंती पत्र दिलं आहे. सगळ्या कायदेशीर बाबींची पूर्तता करुन यादी सोपवली आहे, त्यामुळे राज्यपाल या यादीवर शिक्कामोर्तब करतील,” असा विश्वास परब यांनी व्यक्त केला.

“राज्यपाल यादी मंजूर करतील की, नाही हा जर तरचा प्रश्न आहे. त्यावर आताच भाष्य करणं योग्य नाही. आम्ही सर्व बाबींची पूर्तता करून यादी दिली आहे. त्यामुळे राज्यपाल त्यावर शिक्कामोर्तब करतील अशी आशा आहे,” अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी व्यक्त केली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here