निरस सामन्यात हैद्राबाद सरस

              डॉ अनिल पावशेकर.

पहिल्या क्वालिफायर सामन्याप्रमाणेच हैद्राबाद आणि बंगळूर दरम्यानचा दुसरा सामना सुद्धा निरस झाला आहे. *नाव मोठे लक्षण खोटे* या उपाधीला जागत कोहलीच्या विराट संघाने हैद्राबाद कडून मात खाल्लेली आहे. पहिले फलंदाजी करण्याच्या आयत्या संधीचे बंगळूर संघ सोने करण्यात अपयशी ठरला आणि १३१ धावांचे जुजबी आव्हान उभारू शकला. आजकाल हाणामारीचे बाळकडू पिलेल्या फलंदाजांसमोर इतक्या क्षीण लक्ष्याचे रक्षण करणे कोणत्याही संघासाठी अवघड असते आणि याचीच प्रचिती या सामन्यात आली.

खरेतर कागदावर आरसीबीची फलंदाजी आजही तगडी आहे. कोहली, एबीडी, ॲरोन फिंच, मोईन अली या आंतरराष्ट्रीय धुरंधरांसोबतच नवोदित पडीक्कल, अष्टपैलू शिवम दुबे आणि वॉशिंग्टन सुंदर दिमतीला असताना सुद्धा या सामन्यात बंगळूरची फलंदाजीची भट्टी जमलीच नाही. *आघाडीची बिघाडी* सोडवण्यासाठी स्वत: विराट सलामीला आला परंतु संघाचे नशिब तो बदलवू शकला नाही. याउलट हैद्राबादचा  चाणाक्ष कर्णधार डेव्हिड वॉर्नरने जेसन होल्डरचा सापळा लावताच विराट त्यात अलगद अडकला.

विराट पाठोपाठ या हंगामात सुंदर फलंदाजी करणाऱ्या देवदत्त पडीकलचा संयम सुटला आणि तो सुद्धा होल्डरचा बळी ठरला. चौथ्या षटकापर्यंत दोन्ही सलामीवीर माघारी परतताच आरसीबी एक्सप्रेसला ब्रेक लागला आणि *पॉवर प्ले चा फायदा घेण्यात ते कमी पडले*. तर होल्डरने निर्माण केलेला दबाव फिरकीपटूंनी कायम राखला आणि परिणामस्वरूप फिंचचा बळी गेला. एका टोकाला  गळती लागली असली तरी मैदानात जोपर्यंत एबीडी होता तोपर्यंत बंगळूर संघाला चिंता नव्हती. मात्र आजचा दिवस हैद्राबाद सनरायझर्सचा होता.

आरसीबीला १३१ मध्ये थोपवताच हैद्राबाद ही लढत सहज जिंकणार हे स्पष्ट झाले होते. तरीपण बंगळूर संघ त्यांना कितपत झुंझवतो हे बघणे औत्सुक्याचे होते. याबाबतीत मो. सिराजने पहिल्याच षटकात श्रीवत्स गोस्वामीची विकेट काढून चुणूक जरुर दाखवली. मात्र वॉर्नर आणि मनिष पांडेने दबाव झुगारून आपला धडाडा सुरू केला. भलेही हे दोघेही आठव्या षटकापर्यंत डगआऊटमध्ये परतले असले तरी बंगळूरचे आव्हान छातीत धडकी भरवणारे अजिबात नव्हते. शिवाय बंगळूर संघाकडे *यजुर्वेंद्र चहल सोडता फलंदाजांना आवळू शकणारा दुसरा गोलंदाज नव्हता*.
तर दुसरीकडे हैद्राबाद संघ केन विलीयम्स आणि जेसन होल्डर सारख्या शांत, संयमी जोडीवर *नितांत श्रद्धा ठेवून निश्चिंत होते*.

या जोडीने आरसीबी गोलंदाजांना सामन्यात परतण्याची कुठलीही संधी न देता हैदराबाद संघाला सहजसुंदर विजय मिळवून दिला. सामन्याच्या पुर्वार्धात आरसीबी फलंदाजांच्या कुचकामी कामगिरीने सामन्याचे भवितव्य निश्चित केले होते. हैद्राबाद फलंदाजांनी गोलंदाजांची मेहनत वाया जाणार नाही याची दक्षता घेतली.
वास्तविकत: आरसीबीच्या पतनास त्यांची फलंदाजी कारणीभूत आहे. लागोपाठ पाच सामने गमावणाऱ्या विराट संघाला अखेरपर्यंत लय सापडलीच नाही. स्वत: विराटचे फलंदाजीतील अपयश संघाचे मनोबल उंचावू शकले नाही. तर मोठे आव्हान उभारता न आल्याने गोलंदाज बेअसर ठरले. शिवाय एक मजबूत आणि परिपूर्ण संघ म्हणून आरबीचा संघ या हंगामात आपला प्रभाव पाडू शकला नाही आणि *नेहमीप्रमाणेच हळहळत स्पर्धेबाहेर पडला*

3 COMMENTS

  1. Thank you for another informative website. Where else may just I get that kind of information written in such an ideal means? I have a undertaking that I am just now running on, and I’ve been at the look out for such information.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here