शेतामध्ये मृतावस्थेत    आढळले   बिबट्याचे बछडे 

राष्ट्र सह्याद्री । प्रतिनिधी

    
राजगुरूनगर –  येथील नगरपरिषद हद्दीलगत सातकरस्थळ येथे एका शेतामध्ये सकाळी सुमारे चार ते पाच महिने वय असलेल्या नर जातीचे बिबट्याचे पिल्लू मृतावस्थेत आढळले. दोन दिवसापुर्वी पासून मोबाईलवर बिबट्या संदर्भात काही फोटो व शूटिंग व्हायरल होत होते. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून काहींनी ही दृश्य व फोटो जुन्नर येथील आर्वी गावातील असल्याचा दावा केल्यामुळे नागरिक बेसावध राहिले. आता या घटनेमुळे परिसरात बिबट्याचा वावर असल्याचा संशय खरा ठरला असून; नागरिकांमध्ये यामुळे घबराटीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांच्या जीवाला धोका असताना देखील वनखाते मात्र याकडे  डोळेझाक करत असल्याचेच चित्र दिसून येत आहे.

सकाळी अकरा वाजेपर्यंतही बिबट्या पकडण्यासाठी खात्याकडून पिंजरा लावण्याच्या अथवा इतर काही संरक्षणार्थ हालचाली झाल्याचे दिसत नव्हते. 
आज (दि. ६)  रोजी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान सातकरस्थळ येथील रहिवासी नाना नवले यांच्या घरामागे मक्याच्या शेतात बिबट्याचे नर जातीचे, सुमारे चार ते पाच महिने वयाचे पिल्लू मृतावस्थेत आढळले.

कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये हे पिल्लू मृत झाले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. कारण त्याच्या शरीरावर ओरखडल्याच्या आणि चावा घेऊन फाडल्याच्या जखमा आढळून आल्या आहेत. हे पिल्लू मृतावस्थेत आढळल्यानंतर त्याला पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी येऊन त्या मृत बिबट्याचा पंचनामा केला.

सातकरस्थळ आणि सांडभोरवाडी व आजूबाजूच्या परिसरामध्ये बिबट्या वावरत असल्याच्या अनेक दिवसापासून तक्रारी होत्या. गेल्याच आठवड्यामध्ये सांडभोरवाडी येथे एका कालवडीवर हल्ला झाला होता. तो बिबट्यानेच केला असल्याचे स्थानिकांचे मत होते.  यावर अनेक जणांनी बिबट्या पाहिल्याचाही दावा केला होता. मात्र वनखात्याने याची कोणतीही दखल घेतली नाही.

 गुरुवारी रात्री सातकरस्थळ येथील पाचारणे वस्तीकडे जाणाऱ्या छोट्या रस्त्यावर, दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाच्या दिशेने बिबट्याने झेप घेतली होती. मात्र बिबट्याचा अंदाज चुकल्याने हा तरुण बचावला. बिबट्याची मादी आणि तिचे दोन बछडे या परिसरात वावरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या तरुणावर झेप घेणारा बिबट्या म्हणजे ही मादीच असावी, असा या भागातील लोकांचा संशय आहे. गेल्यावर्षीही या भागात एक बिबट्या आढळून आला होता आणि त्याला काही लोकांनी कॅमेऱ्यात बंदिस्तही केले होते. माजी उपसरपंच राजेंद्र थिगळे यांनी आतातरी प्रशासनाने या परिसरात पिंजरा लावावा; अशी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here