शिर्डीतून बेपत्ता झालेल्या भाविकांचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करा ; औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

प्रतिनिधी / राष्ट्र सह्याद्री 
औरंंगाबाद : शिर्डीतून बेपत्ता झालेल्या भाविकांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमून योग्य ती पावले उचलावीत , असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या .रवींद्र व्ही.घुगे आणि न्या.बी.यु . देबडवार यांनी नुकतेच पोलीस महासंचालकांना दिले आहेत. यामध्ये मानवी तस्करी किंवा मानवी अवयवांची तस्करी करणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत काय यासंदर्भातही तपास करावा, असे आदेशात म्हटले आहे.
याचिकेवरील पुढील सुनावणी येत्या २४ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
या संदर्भात इंदूर येथील रहिवासी मनोजकुमार सोनी यांनी उच्च न्यायालय खंडपीठात हेबियस कॉर्पस सादर केली आहे. .
याचिकेनुसार, ऑगस्ट २०१७ मध्ये ते पत्नी आणि दोन मुलांसह शिर्डी येथे दर्शनासाठी आले होते. दर्शन झाल्यानंतर प्रसादालयापासून त्यांची पत्नी बेपता झाली. बराच शोध घेतल्यानंतर त्यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. पत्नीच्या तपासाबाबत त्यांनी पोलिसांकडे वारंवार पाठपुरावा, चौकशी केली परंतु त्यांना दाद देण्यात आली नाही.
प्रसादालयाजवळचे सीसी टीव्ही बंद असल्याचे या वेळी आढळून आले. सोनी यांनी माहितीच्या अधिकारात शिर्डीतून अशा प्रकारे बेपत्ता झालेल्या व्यक्तींची माहिती मागविली असता, जानेवारी ते ऑक्टोबर २०१७ या कालावधीतच ३० पेक्षा जास्त व्यक्ती बेपत्ता झाले असल्याचे त्यावेळी आढळले होते.
मनोजकुमार सोनी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर २६ ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणी वेळी खंडपीठाने नगरच्या पोलीस अधीक्षकांना बेपत्ता व्यक्तीच्या शोधाबाबतचा अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता. मात्र तो अहवाल समाधानकारक नसल्याचे मत व्यक्त करीत खंडपीठाने पोलीस महासंचालकांना वरील प्रमाणे आदेश दिले आहेत. याचिकाकत्र्यातर्फे अ‍ॅड. सुशांत दीक्षित तर राज्य शासनातर्फे अ‍ॅड. के.एस.पाटील काम पाहत आहेत.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here