काकडी विमानतळाचे पाणी काकडी पाझर तलावात सोडणार

राष्ट्र सह्याद्री । प्रतिनिधी

कोपरगाव : काकडी विमानळाच्या धाव पट्टीवरून वाहून जाणारे पाणी भूमिगत जलवाहिनीच्या माध्यमातून काकडी परिसरात पाझर तलावात सोडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याला मंजुरी देवून विमान प्राधिकरणाने या कामाची निविदा प्रसिद्ध केली असून येत्या चार महिन्यात हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच दिली आहे.

  दुष्काळी गावे अशी ओळख असणाऱ्या काकडीची ओळख शिर्डी विमानतळामुळे २००६ साली बदलली आहे.विमानतळ झाल्यामुळे जगभरातील साई भक्तांना शिर्डी येथे दर्शनासाठी येण्यासाठी होत असलेली गैरसोय दूर होऊन परिसराचा विकास होण्यास मोठी मदत झाली.विमानतळाच्या माध्यमातून काकडी गावाला सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी माजी आ.अशोक काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात नेहमीच पुढाकार घेऊन काकडी व परिसराचे अनेक प्रश्न मार्गी लावले.

काकडी व परिसरातील भूगर्भाची पाणीपातळी वाढण्यासाठी मदत व्हावी यासाठी काकडी विमानळाच्या रनवेवरून वाहून जाणारे पाणी काकडीच्या साठवण तलावात साठवले जावे अशी मागणी काकडी ग्रामस्थांची होती. मात्र या मागणीकडे मागील पाच वर्षात या अत्यंत महत्वाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. त्यामुळे काकडी ग्रामस्थांनी आपले गाऱ्हाणे आपल्याकडे मांडले होते.

या मागणीचा गांभीर्याने विचार करून या वाया जाणाऱ्या पाण्याचा सदुपयोग काकडी परिसराला सुजलाम सुफलाम होण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. याची कल्पना आल्यामुळे  त्याबाबत पाठपुरावा सुरु केला होता. त्या पाठपुराव्याला विमान प्राधिकरणाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.त्याबाबत विमान प्राधिकरणाने नुकतीच ४० लाख रुपये खर्चाची निविदा प्रसिद्ध केली आहे. विमानतळावरून वाहून जाणारे पाणी काकडी परिसरातील पाझर तलावात पाईप लाईनद्वारे सोडण्याच्या कामास तात्काळ प्रारंभ होणार असून येत्या चार महिन्यात हे काम संबंधित ठेकेदारास करणे बंधनकारक आहे.

विमानप्राधिकरणाने या प्रश्नाची दखल घेऊन हे काम सुरु केले त्याबद्दल काकडी व परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.विमान प्राधिकरणाचे उपसंचालक दीपक कपूर,कार्यकारी संचालक चंद्रशेखर गुप्ता,कार्यकारी अभियंता राजकुमार बेरी,विमानतळ संचालक दीपक शास्त्री,सहाय्यक कार्यकारी अभियंता कौस्तुभ ससाणे यांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले.यापुढे देखील काकडी व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी अशाच पद्धतीने सहकार्य करावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here