दुकान फोडले ; पावणेदोन लाखांचा किराणामाल लंपास

राष्ट्र सह्याद्री / प्रतिनिधी

शेवगाव – शहरातील पैठण रस्त्यावरील सार्थक किराणा स्टोअर्सचे पत्रे उचकुन तब्बल एक लाख ८७ हजार रुपये किमतीचा किराणा मालावर चोरटयांनी डल्ला मारला. गेल्या आठवडयातही याच दुकानास लक्ष बनवत पाच लाख रुपये किमतीचा किराणा माल तर शेजारील शुभम अँग्रो एजन्सी या कृषी सेवा दुकानातुन एक लाख ७१ हजार असा सुमारे सहा लाख ७१ हजार रुपयांचा माल चोरटयांनी लंपास केला होता.

अदयाप पुर्वीच्याच दोन चो-यांचा तपास लागलेला नसतांना चोरटयांनी पुन्हा त्याच पध्दतीने पत्रे उचकुन त्याच दुकानांना लक्ष्य बनवल्याने शहरातील दुकानदार ऐन सणासुदीच्या दिवसात भयभीत झाले आहेत.         

याबाबत समजलेली माहिती अशी की, पैठण रस्त्यावरील सार्थक किराणा स्टोअर्स व शुभम अँग्रो एजन्सी ही दोन्ही दुकाने पत्र्याच्या सहाय्याने तयार केलेली असून मागच्या बाजूला वेडयाबाभळी व घाणीचे साम्राज्य असल्याने चोरीसाठी मागील बाजूने सहजासहजी पत्रे काढून दुकानात प्रवेश करता येतो. त्यामुळे सलग तिस-यांदा याच दुकानांना चोरटयांनी लक्ष करुन आतील सणासुदीसाठी मोठया प्रमाणात भरलेला माल लंपास केला.

शनिवार ता.७ रोजी पहाटे २ ते ४ च्या दरम्यान शुभम अँग्रो एजन्सीचे पत्रे एका बाजूचे कापून चोरटयांनी आत प्रवेश केला. याच दुकानातील आतील बाजूने पत्रे कापून शेजारील सार्थक किराणा स्टोअर्समध्ये प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील तुप, तेल, बदाम, काजू, विलायची व इतर किराणा सामान असा सुमारे दोन लाख ८७ हजार रुपये किमतीचा माल चोरटयांनी चोरुन नेला. त्यातील एकास कापलेल्या पत्र्यातून आत प्रवेश करतांना जखम झाल्याने दुकानात सर्वत्र रक्त सांडले होते.         

याबाबतची माहिती समजताच उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंढे, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. नगर येथून ठसे तज्ञ व श्वान पथक दाखल झाले. श्वानाने थोडया अंतरावर माग काढला. रात्री उशीरा पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर दत्तू शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरटयांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here