दिल्लीचा फायनलमध्ये थाटात प्रवेश

डॉ. अनिल पावशेकर

पहिल्या क्वालिफायर सामन्यात मुंबई इंडियन्स कडून सपाटून मार खाणाऱ्या दिल्ली कॅपीटल्सने मरगळ झटकत हैद्राबाद विरूद्ध निर्णायक विजय नोंदवून फायनलमध्ये थाटात प्रवेश केला आहे. ‘जिंकू किंवा जिंकूच’ चा दृढनिश्चय केलेल्या श्रेयस अय्यरच्या संघाने सामन्याच्या सुरवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला आणि अखेरपर्यंत हैद्राबाद संघाला दबावात ठेवले. मुख्य म्हणजे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा दिल्लीचा निर्णय त्यांच्या चांगलाच पथ्यावर पडला.

खरेतर सलामीला वारंवार संधी देऊनही पृथ्वीचे अपयश पाहता दिल्लीला चांगली जोडी मैदानात उतरवणे गरजेचे होते. याकरिता त्यांनी स्टोईनिसवर प्रयोग करून पाहिला आणि हा त्यांचा ‘मार्कस स्ट्रोक ठरला’. अष्टपैलू खेळाडू असलेल्या स्टोईनिसने प्रारंभीच हैद्राबादी गोलंदाजांचा खिमा करत धवनसोबत वेगवान सलामी खेळी केली. वास्तविकत: स्टोईनिसला तो अवघ्या तिन धावांवर असतांना जिवदान मिळाले आणि याचाच फायदा घेत त्याने धवनसोबत ८६ धावांची सलामी देऊन पहिली चढाई जिंकली.

स्टोईनिस ९ व्या षटकात बाद झाला तरी धवनने आपला धडाडा सुरू ठेवला. यात त्याला पहिले श्रेयस अय्यरने आणि नंतर शिमरॉन हेटमायरने उत्तम साथ दिली. विशेषत: हेटमायरने तुफानी फलंदाजी करत २२ चेंडूत ४४ धावा ठोकत हैद्राबादची गोलंदाजी खिळखिळी करुन टाकली. हैद्राबाद संघाला या सामन्यात फलंदाजांऐवजी क्षेत्ररक्षकांनी चांगलेच रडविले. दिल्लीच्या तडाखेबंद फलंदाजांचे जवळपास ४ झेल सोडत ‘त्यांनी आपल्यासाठी कबर खोदून घेतली’.

दिल्लीची अवाढव्य धावसंख्या पाहता वॉर्नर ॲंड कंपनीला चांगली सुरुवात करणे अपेक्षित होते आणि याकरीता स्वत: वॉर्नरने पुढाकार घेणे जरुरी होते. मात्र दिल्लीच्या गोलंदाजांनी आपल्या फलंदाजांचा कित्ता गिरवत चांगले प्रदर्शन घडवले आणि सनरायझर्स फलंदाजांना डोके वर काढू दिले नाही. विशेषतः कगिसो रबाडाने आपल्या पहिल्याच चेंडूवर वॉर्नरच्या दांड्या उडवत ‘हैद्राबादच्या स्वप्नाचा चुराडा करणे सुरू केले होते’.

कर्णधार माघारी परतताच मनिष पांडे, केन विलीयम्स आणि जेसन होल्डरचा हैद्राबादला आधार होता. सोबतच प्रियम गर्ग, अब्दुल समद आणि राशिद खानकडे फलंदाजीची क्षमता नक्कीच होती. मात्र स्टोईनिसने पाचव्या षटकात ‘प्रियम गर्ग‌‌‌ आणि मनिष पांडेचा काटा काढताच हैद्राबाद चा बेडा ‘गर्क’ झाला’. मागच्या सामन्यात आरसीबी विरूद्ध अभेद्य लढा देणारी विलीयम्स, होल्डरची जोडी उपस्थित असेपर्यंत हैद्राबादच्या आशा जिवंत होत्या. मात्र अक्षर पटेल आणि स्टोईनिसने या दोघांचा डाव मोडताच हैद्राबाद संघ गटांगळ्या खायला लागला. तर उरलीसुरली कसर रबाडाने १९ व्या षटकात तिन गडी बाद करत पुर्ण केली.

हैद्राबाद संघाला या सामन्यात कधीच पकड घेता आली नाही. विशेषतः महत्त्वाचे झेल सुटल्याने हा सामना हैद्राबादच्या हातून सुटला. स्टोईनिस आणि धवनच्या झंझावाताने हैद्राबाद गोलंदाजांची लय बिघडून गेली. राशिद खान वगळता इतरांवर दिल्ली फलंदाज तुटून पडले आणि मोठी धावसंख्या उभारण्यात ते यशस्वी ठरले. हैद्राबाद संघ पाठलाग करताना चांगल्या सुरवातीला मुकला आणि विलियम्स वगळता इतर फलंदाज ‘रबाडा ॲंड कंपनीला व्यवस्थित तोंड देऊ शकले नाहीत’.

आता अंतिम सामन्यात दिल्ली कॅपीटल्सला तगड्या मुंबई इंडियन्सचा सामना करावा लागेल. याकरिता त्यांना जी विजयी लय मिळाली आहे ती कायम ठेवावी लागेल. फलंदाजीत रिषभ पंत अजुनही साजेसा खेळ करु शकला नसला तरी स्टोईनिस, धवन आणि हेटमायरची खेळी दिल्ली संघाला दिलासा देऊन गेली असेल. तर मुंबई इंडियन्स हा संघ परिपुर्ण भासत असल्याने आणि यापुर्वी आयपीएल फायनल खेळल्याने ते चषकाचे प्रमुख दावेदार मानले जात आहे. मात्र ‘दिल्लीचा युवा जोश मुंबईच्या अनुभवापुढे अंतिम सामन्यात कसा झुंज देतो हे पाहणे रंजक ठरेल’.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here