राज्यपालांनी अर्णबची काळजी करू नये -भुजबळ 

  
मुंबई:    अन्वय नाईक आत्महत्ये प्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक यांच्या आरोग्याची चिंता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली होती. यावरून अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यपालांना चिमटा काढला आहे.
राज्यपालांनी अर्णब गोस्वामी यांची चिंता करू नये. सरकार त्यांची योग्यप्रकारे काळजी घेत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. त्यामुळे राज्यपाल आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमधील ही टोलेबाजी काही संपताना दिसत नाही. राज्यपालांनी आज अर्णब यांच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त करत गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन केला होता. या संदर्भात छगन भुजबळ यांना नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया विचारण्यात आली असता ते म्हणाले, राज्यपालांनी अर्णब गोस्वामी यांची चिंता करू नये.
नियमानुसार अर्णब यांची सर्व काळजी घेतली जाईल. मात्र राज्यपाल छोटया छोट्या गोष्टीत लक्ष घालत आहेत, ही चांगली गोष्ट असल्याचे भुजबळ यांनी मिश्कीलपणे म्हटले.सुरक्षेच्या कारणास्तव अर्णब यांच्यासह अन्य दोघांना रविवारी तळोजा कारागृहात हलवण्यात आले. या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी अर्णब यांच्या आरोग्याची चिंता व्यक्त करत गृहमंत्र्यांना फोन केला होता. तसेच गोस्वामी कुटुंबियांना त्यांना भेटू देण्याबाबतही राज्यपालांनी सांगितले.
दरम्यान, अर्णब गोस्वामी यांचा अंतरिम जामीन अर्ज आज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. यावर आज सुनावणी झाली असता अर्णब यांना जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे सत्र न्यायालयाकडून जामीन मिळेपर्यंत अर्णब गोस्वामी यांना तळोजा कारागृहातच राहावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here