साखर कारखानदार तुपाशी, शेतकरी उपाशी

थकीत ऊस बिलाच्या वसुलीसाठी शेतकरी संघटनेचे

प्रसाद शुगर कारखान्याच्या अध्यक्षांच्या राहुरी येथील निवासस्थानासमोर बेमुदत धरणे आंदोलन

श्रीरामपूर: प्रसाद शुगर कारखान्याने सन २०१८-१९ हंगामात ऊस बिलाच्या फरकाची प्रतिटन २२१ रुपया प्रमाणे रक्कम दोन वर्षे उलटूनही अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केलेली नाही. ऊस बिल फरकाची थकीत रक्कम कायद्यातील तरतुदीनुसार व्याजासह मिळण्यासाठी शेतकरी संघटनेने ऊस पुरवठादार शेतकऱ्यांसह वेळोवेळी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक सहसंचालक (साखर) अहमदनगर यांनी प्रसाद शुगरच्या व्यवस्थापनास प्रतिटन २२१ प्रमाणे रक्कम ऊस पुरवठादारांना अदा करण्याचे सूचित करूनही कारखान्याने रक्कम अदा केली नाही.

त्यामुळे प्रादेशिक सहसंचालकांनी ऊस बिलाच्या थकीत रकमेच्या वसुलीसाठी प्रसाद शुगर कारखान्याविरुद्ध आर.आर.सी.कारवाईचा प्रस्ताव स्वयंस्पष्ट अभिप्रायासह साखर आयुक्त, पुणे यांचेकडे सादर केला आहे.

प्रसाद शुगर कारखान्याने सन २०१८-१९ हंगामात कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस पुरवठादार शेतकऱ्यांमध्ये भेदभाव करून राहुरी परिसरातील शेतकऱ्यांना प्रतिटन २३२१ रु.व श्रीरामपूर परिसरातील शेतकऱ्यांना प्रतिटन २१०० रु. प्रमाणे ऊस बिले अदा केली होती. तोडणी व वाहतूक खर्च वगळून सर्व ऊस उत्पादकांना एकसमान ऊस दर देणे कायद्याने बंधनकारक असताना व मा. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने याचिका क्र.४१६२/९८मध्ये देखील तसे आदेश दिलेले असताना प्रसाद शुगर च्या व्यवस्थापनाने कायदशिर तरतुदीे व न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा भंग करून ऊस बिल फरकाची प्रतिटन २२१ रू.देण्यास टाळाटाळ केली आहे.

त्यामुळे शेतकरी संघटनेने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह प्रसाद शुगर कारखान्याचे अध्यक्ष यांच्या राहुरी येथील निवासस्थानासमोर गुरुवार दि.१२नोव्हेंबर पासुन उपाशीपोटी बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्धार केला असुन, ऊस बिलाच्या फरकाची रक्कम व्याजासह ऊस उत्पादकांच्या बँक खात्यात वर्ग झाल्याशिवाय आंदोलन सुरू राहील. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर साखर कारखानदार तुपाशी, शेतकरी उपाशी अशी भूमिका घेऊन आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब पटारे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here