उच्च न्यायालयाच्या या आदेशाविरोधात अर्णव यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव


मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक वाहिनीचा मालक संपादक अर्णव गोस्वामी यांना मुंबई उच्च न्यायालयाने काल अंतरिम जामीन नाकारला होता. आता उच्च न्यायालयाच्या या आदेशाविरोधात अर्णव यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून अर्णव यांना दिलासा मिळणार की नाही याकडे लक्ष लागले आहे.

अलिबाग पोलिसांनी अर्णव गोस्वामी यांना अटक केल्यानंतर त्यांना महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले होते. त्यावेळी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यावर अर्णव यांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावत त्यांना सत्र न्यायालयात जाण्यास सांगितले होते.

त्यामुळे त्यांच्या वकिलाने सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असून आता सर्वोच्च न्यायालयातही अर्ज केला आहे.

दरम्यान, अर्णव यांच्यावतीने त्यांच्या वकिलाने एफआयआर रद्द करण्यासाठी आणि जामीन मिळण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. तीन दिवस त्यावर दोन्ही बाजूने युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर उच्च न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावत अर्णव यांना जामीन देण्यास नकार दिला होता.

हे विशेष प्रकरण नाही. त्यामुळे जामिनासाठी ज्या प्रचलित यंत्रणा आणि पद्धती आहेत त्यानुसारच अर्ज करून जामीन घेण्यात यावा, असे निर्देश न्यायालयाने दिले. या प्रकरणात जामीन दिल्यास ही प्रथा पडून जाईल आणि कोणीही उठसूठ उच्च न्यायालयात येऊन जामिनासाठी अर्ज करेल, असे मतही न्यायालयाने व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here