फडणवीस यांच्या नियोजनाचा आणि अनुभवाचा बिहार भाजपला  फायदा


मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजनाचा आणि अनुभवाचा आम्हाला मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. सध्या येत असलेल्या कलानुसार भाजपने जोरदार मुसंडी मारलेली आहे. तिथे फडणवीसांच्या प्रचाराचा आम्हाला फायदा झाला, असे वक्तव्य बिहार भाजपचे प्रदेश प्रवक्ते संजय टायगर यांनी केले आहे. “बिहार निवडणुकीच्या प्रचारात देवेंद्र फडणवीस यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या, आक्रमक प्रचार केला.

पक्षाची बाजू मांडली तसेच विरोधकांच्या चुकीच्या गोष्टींवर फडणवीसांनी बोट ठेवले. एकूणच प्रचार कार्यक्रमात फडणवीसांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या नियोजनाचा आणि अनुभवाचा आम्हाला मोठा फायदा झाला”, असे संजय टायगर म्हणाले.
भाजपने देवेंद्र फडणवीस यांची बिहारच्या प्रभारीपदी नियुक्ती केली होती.

अधिकृतरित्या नियुक्ती होताच त्यांनी बिहार जिंकण्याचा इरादा बोलून दाखवला होता. “भारतीय जनता पक्षाने माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. त्या जबाबदारीला निश्चित न्याय देण्याचा प्रयत्न करेन, यंदाच्या निवडणुकीत एनडीए बहुमताने जिंकेल” असा दावा फडणवीस यांनी केला होता.

बिहार भाजपच्या या यशाचे श्रेय बिहार निवडणुकीचे भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना दिले जात आहे. फडणवीसांनी बिहारच्या प्रचाराची धुरा चांगल्या प्रकारे सांभाळली त्यामुळे भाजपला घवघवीत यश मिळत असल्याचे भाजप नेत्यांकडून सांगितले जात आहे.
फडणवीसांमुळे बिहारमध्ये भाजपला यश- बावनकुळे
बिहारमध्ये भाजपने मोठे संघटन उभारले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी ज्या प्रकारे प्रचाराची धुरा सांभाळली त्याचेच यश बिहार निवडणुकीत दिसत आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

“बिहार निवडणुकीत ज्या पद्धतीने भाजपने संघटन उभारले आणि पाच वर्षांत जे काम झाले. त्याचा परिणाम निकालावर झालेला दिसतो आहे. एनडीएला जनतेने भरभरून मते दिली आहेत. त्यामुळेच बिहारमध्ये एनडीएची सत्ता पुन्हा येणार असल्याचं दिसत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने बिहारमध्ये प्रचाराची धुरा सांभाळली त्याचेच यश बिहार निवडणुकीत दिसून येत आहे.” असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

बिहारचे यश फडणवीसांचे देखील- प्रसाद लाड
“विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बिहार निवडणुकीची जबाबदारी उचलली. राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व केले. त्यामुळे हे देवेंद्र फडणवीस यांचंही यश आणि विजय आहे”, असे आमदार प्रसाद लाड म्हणाले.
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल काही तासांत स्पष्ट होतील. मतमोजणी अजूनही सुरु आहे.

आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील रालोआला बहुमत मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या भाजप 75 जागांवर आघाडीवर आहे. एवढेच नव्हे तर भाजप आपला मित्रपक्ष असेलेल्या जदयूच्याही पुढे असल्याचे दिसते. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार बिहारमध्ये भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here