डबल इंजिनचा डबल युवराजांना ‘दे धक्का’

डॉ अनिल पावशेकर

अवघ्या भारतभुमीचे लक्ष वेधलेल्या बिहार विधानसभा निवडणूकांचे निकाल जाहीर झालेले असून एनडीए ने बिहारच्या डिएनए ची नस ओळखत तेजस्वींच्या महागठबंधनला अटीतटीच्या सामन्यात धुळ चाललेली आहे. अत्यंत उत्कंठावर्धक झालेल्या या लढतीत हेवीवेट एनडीए ने कच्चा निंबू महागठबंधनचा कडवा प्रतिकार मोडून काढत विजयावर शिक्कामोर्तब केलेले आहे. अर्थातच या द्वंदात तेजस्वी यादव *मॅन ऑफ दी मॅच* तर पंतप्रधान मोदी *मॅन ऑफ दी सिरीज* ठरलेले आहे. तर नितीशबाबू जिवावर बेतले पण बोटावर निभावले म्हणून समाधान व्यक्त करत आहेत.

खरेतर सुशासन बाबु़ंचा लागोपाठ पंधरा वर्षांचा कारभार म्हटले की ॲंटी इन्कंबंसी अपेक्षीतच होते. तरीपण नितीशकुमारांना मोदी मॅजिकचा परिसस्पर्श होताच मैदानातले वातावरण बदलले आणि एनडीए पुन्हा एकदा सत्तारुढ होण्याचा मार्ग मोकळा झाला. मोदींचा आक्रमक प्रचार आणि जिव्हाळ्याच्या भाषणाने जनतेला मोहिनी घातली आणि कधी नव्हे ते भाजपाने जवळपास पाऊनशे जागांवर कब्जा करत आपली वाढलेली ताकद दाखवून दिली. याउलट जदयुचे देऊळ यावेळी पाण्यातच होते. शिवाय चिराग पासवानने *हम भी डुबेंगे, तुमकोभी ले डुबेंगे* चा राग आवळताच जदयुला फटका बसणार हे निश्चित होते.

तर दुसरीकडे एनडीए ला शह देण्यासाठी तेजस्वीने कॉंग्रेसचा हात पकडला. मात्र कांग्रेसचे *जो भी कदम बढे, बर्बादीकी ओर बढे* असल्याने राजदला कांग्रेसचा काकस्पर्श होताच राजदची तेजस्वी घोडदौड मर्यादित राहिली. तर ७० जागा लढवून केवळ १९ जागा जिंकत कांग्रेस ने वरपास होऊन दाखवले. मोदींच्या सभेने एनडीए च्या जागात भर पाडली तर राहुल गांधींनी जिथे सभा घेतल्या तिथे महागठबंधनच्या पदरात अपेक्षीत लाभ पडला नाही. युपीत अखिलेश असो की बिहारमध्ये तेजस्वी असो या दोघांनाही कांग्रेसची संगत मानवली नाही.

वास्तविकत: बिहार निवडणूका देशाचे अंतर्मन जाणणाऱ्या ठरल्या. यात खरी गोची झाली ती ढोंगी पुरोगाम्यांची आणि एका विशिष्ट घराण्याची पालखी वाहणाऱ्या माध्यमांची. विशेषतः बिदागी, नजराणे आणि खैरातीला चटावलेल्या आश्रित व पोषित पत्रकारांची अवस्था भयानक झाली. निकालाच्या दिवशी विविध वृत्तवाहिन्यांवर स्वयंघोषित विचारवंतांचे *पडेल आणि सुतकी चेहरे पाहता ही निवडणूक भाजपा जिंकत आहे* हे सांगायला कोणत्याही भविष्यवेत्त्याची अजिबात गरज नव्हती.

खरेतर अशाप्रसंगी निष्पक्ष वृत्तांकन करून त्यांना जनतेचा माध्यमांवर विश्वास नक्कीच वाढवता येऊ शकला असता.
मात्र खाल्लेल्या मिठाला जागत या ढोंग्यानी सत्याकडे दुर्लक्ष करणे पसंत केले. मोदींचा करिष्मा नाकारून *सत्तेचा माज आणि पैशांचा गैरवापर* असे परवलीचे शब्द वापरत वेळ मारून नेली. मात्र केवळ बिहारच नव्हे तर उत्तर दक्षिण, पुर्व पश्चिम झालेल्या पोटनिवडणुकीतही भाजपाने मारलेली मुसंडी कशीकाय विसरता येईल? अर्थातच *कळते पण वळत नाही* अशी स्थिती आहे. मात्र जनता सुज्ञ आहे. दहा बाय दहाच्या खोलीतून जगभराचे एकांगी निष्कर्ष काढणाऱ्यांचा आणि एक्झीट पोलवर हर्षवायू झालेल्या या पुरोगामी टोळक्याचा नक्षा जनतेने एका झटक्यात उतरवून टाकला आहे.

आधीच *अर्णव अटकेच्या  हळकुंडाने पिवळे झालेले आणि ट्रम्पच्या पराभवाने गदगद झालेले* तमाम नमोरोगी एक्झीट पोलने बेहोश झाले होते. जणुकाही जगबुडी झाल्यासारखे मोदींनी पायउतार व्हावे याकरिता देव पाण्यात बुडवून बसले होते. कित्येकांना तर तेजस्वी यादवमध्ये पृथ्वीचा तारणहार दिसू लागला होता. इतकेच नव्हे तर तेजस्वीच्या जन्माच्या खाणाखुणा ते त्याचे बाळुतं वाळू घालायची जागासुद्धा या ढोंग्यांनी शोधून काढली होती. मात्र झाले उलटेच. तेजस्वीच कशाला,एरवी गल्लीबोळातले खरजीले कुत्रं जरी मोदींविरोधात भुंकायला लागले तर हीच मंडळी त्याला जावई बनविण्यासाठी एका पायावर तयार असतात.

मात्र निवडणूक निकालाने यांचे बारा वाजवले गेले आणि या टोळक्याचा तेजस्वी सहारा निखळला गेला.
निश्र्चितच कोरोनाचा आपातकाळ असो की लॉकडाऊनचा खेळखंडोबा असो, अशा पार्श्र्वभूमीवर निवडणूक जिंकणे हे भाजपासाठी एक दिव्यच होते. सोबतच सीएएचा तडका, किसान बिल, बेरोजगारी अशा एक ना अनेक प्रश्नांना समर्थपणे पुरुन उरत मोदींनी देशभरात भाजपाला अच्छे दिन आणून दिले. या रणधुमाळीतही तेजस्वी यादवने दाखवलेली चुणूक कौतुकास्पद आहे.

तर ढोंगी पुरोगामी अजुनही *एक ना एक दिवस आपला बैल दुध देईल* या आपेक्षेवर जगत आहे. तर बिहारच्या विजयाने भाजपाचा आत्मविश्वास दुणावला असून आपल्या कर्णधारावर त्यांचा सार्थ विश्वास आहे. हाच धागा पकडून ते पुढे येणाऱ्या प.बंगाल विधानसभा निवडणूकांना आणखी जोमाने सामोरे जातील अशी अपेक्षा आहे.

6 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here