कमला हॅरिस यांचा विजय नारीशक्तीला बळ देणारा

  श्याम ठाणेदार  
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष, उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिप्लब्लिकन पक्षाचे उमेदवार  डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव झाला आहे. त्यांचा पराभव करणारे  डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडेन हे अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेणार आहेत. ज्यो बायडेन यांचा विजय भारतातील सर्व नागरिकांना निर्भेळ आनंद देणारा आहे का  हे जरी सांगता येत नसले तरी  याच निवडणुकीत उपराष्ट्राध्यक्ष म्हणून निवडुन आलेल्या कमला हॅरिस यांचा विजय मात्र  सर्व नागरिकांना नक्कीच आनंद देणारा आहे.
उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी कमला हॅरिस यांची  उमेदवारी जाहीर झाल्यापासून भारतात त्यांच्याविषयी चर्चा होत होती इतकेच नाही तर त्याच निवडणूक जिंकाव्यात यासाठी प्रार्थना होत होती. त्याचे कारणही हेच की कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या आहेत. त्यांच्या आई श्यामला  गोपाल या भारतीय वंशाच्या असून वडील वडील जमेकाचे आहेत. त्यांचा जन्म ऑकलंड येथे झालेला आहे ; पण आई वडिलांच्या घटस्फोटानंतर भारतीय वंशाच्या  आईनेच त्यांचा सांभाळ केला आहे. कमला हॅरिस यांच्या आईने त्यांना भारतीय संस्कार दिले.
भारतीय संस्करातच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांच्या आई जरी अमेरिकी आफ्रिकी संस्कृतीत राहिल्या तरी त्यांनी आपल्या दोन्ही मुलींना कमला आणि माया यांना भारतीय संस्कृतीतच वाढवले. त्यांच्या आई श्यामला गोपालन या कर्करोगासंबंधीच्या संशोधक आणि मानवअधिकार कार्यकर्त्या म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांचे सामाजिक आणि वैद्यकीय कार्य भारतीयांना अभिमान वाटावे असेच आहे.
कमला यांचे अनेक नातेवाईक बंगळुरू आणि चेन्नई येथे राहतात त्या अनेकदा बंगळुरू आणि चेन्नई येथे येऊन आपल्या नातेवाईकांना भेटून गेल्या आहेत. त्यांच्या विजयाने बंगळुरू आणि चेन्नईमध्येच नव्हे तर संपूर्ण भारतात आनंद व्यक्त होत आहे. देशभर त्यांचे कौतुक होत आहे. कमला यांचा स्वभाव बोलका, मनमिळाऊ असल्याने समोरच्या व्यक्तीवर त्यांची लगेच  छाप पडते.  शालेय जीवनापासूनच त्या सामाजिक कार्यात भाग घेत. त्यांचे शिक्षण हार्वर्ड विद्यापीठात झाले. होस्टिंग कॉलेज ऑफ लॉ येथून त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले.
कमला हॅरिस या मुळातच सामाजिक जाण आणि जबाबदारी असलेले व्यक्तिमत्व. कायदा, मानवी तसेच नागरिकत्वाचे हक्क व अधिकार या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामानेच त्यांना नाव व प्रसिद्धी मिळवून दिली. कमला हॅरिस यांनी सिनेट मध्ये केलेले भाषण म्हणजे उत्कृष्ट वक्तृत्वाची मेजवानी तर होतीच; परंतु त्यामागे ठाम विचार आणि बांधिलकीही दिसत होती.  सुरवातीपासूनच डेमोक्रॅटिक पक्षाकडे ओढा असल्याने अनेक वर्षांपासून त्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या राजकारणात सक्रिय होत्या. मात्र गेल्या पाच वर्षात त्यांचे नाव झाले. खरेतर त्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी इच्छुक होत्या पण पक्षाने त्यांना उपराष्ट्राध्यक्ष पदाची उमेदवारी दिली.
या निवडणुकीत सुरवातीपासूनच त्यांचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगी होता. याच आत्मविश्वासाच्या बळावर आणि केलेल्या कार्याच्या जोरावर त्यांनी ही निवडणूक सहज जिंकली. या पदावर पोहचवणाऱ्या त्या पहिल्या महिला, पहिल्या भारतीय वंशज आहेत त्यामुळेच त्यांच्या विजयाने भारतात जल्लोषाचे वातावरण आहे. त्यांच्या विजयाने  समस्त नारीशक्तीला बळ मिळणार आहे.  त्यांचा  विजय भारतालाही लाभदायक ठरेल अशी आशा आहे. कमला हॅरिस यांचे अभिनंदन! 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here