नगर जिल्ह्यातील 30 लाख लीटर दूध भुकटी साठी पाठवले

1

जिल्ह्यातील सहकारी दूध संघांना सरकारच्या निर्णयाने दिलासा; ३१ मेपर्यंत दूध खरेदी

राष्ट्र सह्याद्री प्रतिनिधी

राज्यात सध्या लॉकडाउनमुळे दूध मोठ्या प्रमाणात अतिरिक्त ठरत आहे. या अतिरिक्त दुधाचे संकलन करून भुकटी तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सहकारी दूध संघांनी महिनाभरात ३० लाख लिटरपेक्षा जास्त दूध भुकटी तयार करण्यासाठी पाठवले आहे.

राज्यात अतिरिक्त ठरणारे दूध खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार दररोज दहा लाख लिटर दूध खरेदी करण्यात येणार आहे. या योजनेत ३१ मेपर्यंत दूध खरेदी सुरू राहणार आहे. या अतिरिक्त दुधाची भुकटी तयार करण्यात येणार आहे. सहकारी दूध संघांनी खरेदी केलेले अतिरिक्त दूध या दूध पावडर प्रकल्पांना पाठवण्यात येत आहे. जिल्ह्यातील सहकारी दूध संघांना कोटा ठरवून देण्यात आला आहे. त्यानुसार दूध संघ दूध खरेदी करून या प्रकल्पांना पाठवत आहेत. जिल्ह्यात गेल्या २४ दिवसांत श्रीगोंदे, संगमनेर, राहाता, राहुरी, अकोले, कोपरगाव या काही तालुका सहकारी दूध संघांनी आतापर्यंत साधारण ३० लाख लिटर दूध पाठवले आहे. जिल्ह्यात दर दिवशी साधारण १ लाख २५ हजार लिटर दूध या भुकटी प्रकल्पांना पाठवण्यात येत आहे, अशी माहिती नगर जिल्हा दुग्ध व्यवसाय विभागाने दिली.

दरम्यान, ही योजना ३१ मेपर्यंत सुरू राहणार असल्याने जिल्ह्यात दूध खरेदी सुरू आहे. त्यामुळे सहकारी दूध संघांच्या खरेदीत आणखी वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले.

लॉकडाउन काळात दुधाला मागणी नसल्याने दूध अतिरिक्त होत असून, दुधाचे दर कोसळले आहेत. लिटरमागे साधारण दहा ते बारा रुपयांनी दर कमी झाले आहेत. नगर जिल्ह्यात दूधव्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. मागील वेळी दुष्काळामुळे दुग्ध व्यवसायास फटका बसला. या वेळी उन्हाळ्यात पाणी आणि चाऱ्याची उपलब्धता असली, तरी करोना व्हायरसमुळे जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायास मोठा फटका बसला आहे. दुसरीकडे दुधाच्या मागणीतसुद्धा मोठी घट झाली आहे. हॉटेल, चहाची दुकाने बंद आहेत. या ठिकाणी दुधास मोठी मागणी असते. मात्र, गेल्या दीड महिन्यापासून ही दुकाने बंद आहेत. त्यामुळे दुधाला मागणी घटली आहे. सध्या फक्त पिशवीबंद दुधास मागणी आहे. त्यामुळे दूध अतिरिक्त ठरत आहे. या अतिरिक्त दुधाचे करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य सरकार सध्या फक्त सहकारी दूध संघांकडून अतिरिक्त दूध खरेदी करत आहे. खासगी दूध संघांचा सरकारने अद्याप विचार केलेला नाही.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here