Ahmednagar: दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा

0

चार लाख ३८ हजार महिलांना लाभ

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री

नगर : केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या गरीब कल्याण योजनेंतर्गत जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जात आहेत. दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील जवळपास ४ लाख ३८ हजार जनधन बँक खात्यांत २१ कोटी ९० लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. यानंतर तिसऱ्या टप्प्यातील अनुदान पुढील महिन्यात अशाच पद्धतीने जमा होणार आहेत.

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन आहे. या काळात देशातील गरिबांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे अशा कुटुंबांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने महिलांच्या बँक खात्यात दरमहा पाचशे रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरातील जनधन बँक खात्यात दुसऱ्या टप्प्यातील अनुदान जमा करण्यात आले आहे. नगर जिल्ह्यातही अनुदान जमा करण्यात आले आहे. जिल्ह्यात जनधन योजनेची जवळपास ९ लाख खाती आहेत. यामध्ये ४ लाख ३८ हजार १३१ महिलांची खाती आहेत. केंद्र सरकारने या चार लाख खात्यांमध्ये पाचशे रुपयांप्रमाणे २१ कोटी ९० लाख रुपये अनुदान जमा केले आहे.

दरम्यान, खात्यातून पैसे काढण्यासाठी खातेदारांनी गर्दी करू नये यासाठी वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार खातेदारांना पैसे काढता येणार आहे. त्यामुळे बँकेत गर्दी होणार नाही. या पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे.

पोस्टामार्फत सुद्धा या खात्यांतील पैसे काढता येणार आहेत. यासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता नाही. पोस्ट पेमेंट बँक योजनेंतर्गत सर्व बँकांच्या खातेधारकांसाठी आधार अनेबल पेमेंट सर्व्हिस सुरू करण्यात आली आहे. यामध्ये खातेदारांचा आधार नंबर बँक खात्यास लिंक असेल तर त्यांना त्यांच्या बँक खात्यातील रक्कम सुद्धा पोस्टाद्वारे मिळते. बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी नागरिकांची गर्दी होऊ नये, यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here