पिंपरी चिंचवड : पुण्यातील प्रसिद्ध गोल्डमॅन व उद्योजक सम्राट मोझे यांचे हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं आहे. पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात उपचारादरम्यान सम्राट मोझे यांनी अखेरचा श्वास घेतला. अंगावर भरमसाट सोनं घालण्यासाठी सम्राट मोझे प्रसिद्ध होते. सम्राट मोझे यांनी मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचा अंगावर सोनं घालण्याचा रेकॉर्ड ब्रेक केल्याचीही पुण्यात चर्चा आहे. मोझे हे दररोज अंगावर जवळपास साडेआठ किलो सोनं घालत होते. गेल्या आठवड्यातच त्यांनी आपला 39वा वाढदिवस साजरा केला होता.
सम्राट मोझे यांनी काही दिवसांपूर्वीच बनावट फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून त्यांची बदनामी केली जात असल्याची पोलिसांच्या सायबर सेलला तक्रार दिली होती.
चुलते आणि माजी आमदार रामभाऊ मोझे यांच्या राजकीय कारकिर्दीमुळे त्यांना राजकीय वारसा लाभला.
राष्ट्रवादीकडून पुणे मनपा निवडणूक उमेदवारी मिळवण्यासाठी सम्राट मोझे यांनी चक्क अंगावर साडेआठ किलो सोनं घालून मुलाखत दिली होती. सम्राट पुण्याच्या संगमवाडीच्या प्रभाग क्रमांक 13मधून निवडणूक लढवणार होते. आपण केलेल्या सामाजिक कार्यामुळे अजित पवार हे आपल्याला पुणे महापालिका निवडणुकीचं तिकीट देणारच, असा विश्वास सम्राट मोझे यांनी त्यावेळी व्यक्त केला होता.