Karjat : कोरोनामुळे उन्हाळी व्यवसाय करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ; लगीनसराई बुडल्याने त्यावर आधारित व्यावसायिक हतबल

0
प्रातिनिधिक छायाचित्र

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री दि ६

कर्जत : कोरोनाला अटकाव करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांनी लॉकडाऊन पुकारत देशात सर्वत्र संचारबंदी लागू केली होती. याच पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यात देखील लॉकडाऊनमुळे सर्वच तालुक्यातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार आणि दुकाने १९ मार्चपासून आजतागायत बंद करण्यात आले आहे. यामुळे उन्हाळी हंगामातील अनेक शीतपेये, कुल्फीचालक आणि रसवंतीच्या दुकानाना मोठा फटका बसला आहे. त्यांच्यावर आर्थिक अडचणीसह आगामी काळासाठी उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे.
कोरोनाने देशात आणि राज्यात चांगलेच थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे देशासह राज्यात आणि जिल्ह्यासह प्रत्येक तालुक्यात लॉकडाऊन पुकारत संचारबंदी घोषित करण्यात आली होती. त्यामुळे कर्जत तालुक्यातील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वितिरिक्त इतर सर्व व्यवहार आणि दुकाने आजतागायत बंद करण्यात ठेवण्यात आले आहे. कर्जत तालुक्यात १९ मार्चपासून जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशानुसार तालुका प्रशासनाने सर्व दुकाने बंद ठेवले आहेत. यासह संचारबंदी लागू केल्याने भाजीपाला आणि फळविक्रेते शिवाय कुणालाही इतर व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आल्याने कर्जत शहर आणि तालुक्यातील अनेक व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे.
यामध्ये सर्वात जास्त फटका शीतपेये, कुल्फी चालक, पेप्सी, आणि रसवंतीगृहांना बसला आहे. वरील व्यावसायिक आपली दुकाने फक्त याच उन्हाळ्याच्या काळात चालू करत उदरनिर्वाह करीत असल्याने यंदा सर्वांना फार मोठा आर्थिक फटका बसला असल्याची भावना विक्रेत्यांनी आमच्या प्रतिनिधीकडे व्यक्त केली. उन्हाळ्याच्या काळात शालेय परीक्षेचा मोठा काळ शीतपेयेसाठी पूरक असतो. यासह सुट्टीच्या काळात गावोगावी होणारी आवक-जावक यासह बच्चेकंपनीचे आवडते खाद्य असणारे पेप्सी, उसाचा रस, लस्सी, आईसक्रीम, श्रीखंड यासह विविध शीतपेयाची मोठी आर्थिक उलाढाल होत असते.
मात्र, यंदा कोरोनामुळे या व्यासायिकांना अवघे पंधरा ते वीस दिवसच मिळाले असून त्याची विक्री फार कमी झाली असल्याचे विक्रेते प्रतिक्रिया देत आहेत. त्यामुळे शासनाने अशा व्यावसायिकांसाठी काही आर्थिक मदत उपलब्ध करावी अशी मागणी कर्जत शहर आणि तालुक्यातील ए-वन कुल्फीचे संचालक राजू बागवान यांनी केली आहे. अन्यथा वरील व्यावसाय करणाऱ्यांवर भविष्यात उपासमारीची वेळ निर्माण होणार आहे.
वाजंत्री, मंडपचालक, डेकोरेटर आणि केटर्स यांचे व्यवसाय बुडीत
कोरोनामुळे यंदाची लगीनसराई पूर्णपणे वाया गेल्याने यावर आधारित असणारे व्यावसायिकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वाजंत्री, बँडचालक, मंडप, डेकोरेटर, जेवणावळी करणारे केटर्स यासह भांडी दुकाने, फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक व्यासायिकांना कोरोनाची झळ अप्रत्यक्ष पोहचली आहे. तसेच लग्नाकार्यात वाहतुकीसाठी लागणा-या वाहनांना पण याचा फटका बसला आहे.

शेतकऱ्यांच्या शेतमालाला अल्प भाव तर कलिंगड टरबूजची कवडीमोल विक्री

लॉकडाऊनमुळे आठवडे बाजार बंद करण्यात आल्याने अनेक शेतकऱ्यांना आपले फळभाज्या तालुका सोडून इतर तालुक्यात विक्रीसाठी नेता आले नाहीत. तसेच वाहतुकीसाठी परवाना इतर बाबी पूर्तता करण्यास अडचण निर्माण झाल्याने त्यांचा शेतमाल गावातच विक्रीसाठी ठेवा लागला आहे. त्यातही विक्रीसाठी वेळेची मर्यादा असल्याने खेळते भांडवल निर्माण व्हावे यासाठी अल्पदरात विक्रीची वेळ शेतकऱ्यांवर निर्माण झाली तर उन्हाळ्यात आणि खासकरून मुस्लिम धर्मियांच्या रमजानसाठी मोठी मागणी असणारे कलिंगड आणि टरबूज अत्यंत कमी दरात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here