Newasa : कंत्राटी ग्रामीण आरोग्य कर्मचारी ‘रामभरोसे’ – कमलेश गायकवाड 

0
परिचारिकेचा जीव जाता जाता राहिला : वरिष्ठांना सोयरसुतक नाही

प्रतिनिधी | कमलेश गायकवाड | राष्ट्र सह्याद्री 

नेवासा फाटा – राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना विशेषतः परिचारिकांना शासकीय संरक्षण देण्याची मागणी केंद्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कमलेश गायकवाड यांनी आरोग्य मंत्र्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना शासनाने चक्क ‘रामभरोसे’ ठेवल्याचा आरोप गायकवाड यांनी निवेदनात केला आहे. 
मूळ नेवासा येथील रहिवासी असलेल्या व आरोग्य विभागात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या मंगल विठ्ठल पातोरे या महिलेची सहा महिन्यांपूर्वी श्रीरामपूरला बदली झाली आहे. अत्यल्प पगार त्यात घरापासून लांब नोकरी या संघर्षात त्यांची सेवा सुरू असतानाच एका रस्ता दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. जीवन-मरणाच्या द्वंद्वात त्यांनी कशीबशी अखेर मृत्यूवर मात केलेली असली तरी त्यांच्या या संघर्षात शासनाच्या आरोग्य विभागाने त्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडून दिल्याच्या धक्कादायक प्रकाराकडे गायकवाड यांनी याद्वारे लक्ष वेधले आहे.
या प्रकरणात त्या कंत्राटी कर्मचारी आहेत हा जणू त्यांचा घोर अपराधच असल्याचा संशय आरोग्य विभाग वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्यांच्या बाबतीत एकंदर वर्तणूक पाहता प्रचिती येत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
अपघातात पातोरे यांना झालेली गंभीर दुखापत झाल्याने त्या मोठा कालावधी कामावर जाऊ शकणार नाहीत. येथे त्यांना त्यांच्या वरिष्ठांच्या असंवेदनशीलतेचा पुरेपूर प्रत्यय आल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. पातोरे यांच्या अपघाताची माहिती मिळूनही त्यांचा एकही वरिष्ठ अधिकारी त्यांना धीर देण्यासाठी फिरकला तर नाहीच परंतु त्यांनी त्यांना शासकीय सुविधा मिळवून देण्याचे साधे औदार्यही दाखविले नसल्याची खंत गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. जणू त्या पुन्हा कामावर येणारच नाही, अशी खात्रीच त्यांच्या वरिष्ठांना वाटल्याचा संशय गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.
गरजेपोटी कायम कर्मचार्यांपेक्षाही अधिक कार्यक्षमतेने कुठलीही कुरकुर न करणाऱ्या या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना शासनाने चक्क ‘रामभरोसे’ ठेवल्याचे या निमित्ताने समोर आल्याचा खळबळजनक आरोप गायकवाड यांनी या निवेदनात केला आहे. या परिचारिकेला गंभीर दुखापत झालेली असल्याने मोठ्या कालावधीसाठी घरीच राहावे लागण्याची शक्यता असल्याने त्यांची रजा बिनपगारी न करण्याचा संवेदनशीलपणा दाखविण्याचे आवाहन गायकवाड यांनी आरोग्यमंत्र्यांना केले आहे. तसेच कातोरे यांच्यावर श्रीरामपूरमधील कामगार हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कायम कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून तुल्यबळ लढत देणाऱ्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांच्याप्रमाणेच शासकीय सोयी सुविधा तसेच संरक्षण देण्याची आग्रही मागणी गायकवाड यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांची उपेक्षा थांबावी  
ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेले कंत्राटी आरोग्य कर्मचारीच उपेक्षित असल्याचे वास्तव आहे. कायम कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने आरोग्य सेवा पुरवत असूनही शासन कंत्राटी आरोग्य सेवकांच्या बाबतीत भेदभाव करत आहे, ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे. ग्रामीण भागात आरोग्य सेवा मजबूत आणि सतर्क करायची असेल तर या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम कर्मचार्यांप्रमाणे सोयी-सुविधा व संरक्षण मिळणे गरजेचे आहे. त्यांची सुरू असलेली उपेक्षा त्वरीत थांबवा.
– कमलेश गायकवाड, राष्ट्रीय उपाध्यक्ष, केंद्रीय पत्रकार संघ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here