एकावन्न गरजूंना पंधरा दिवसांचा जीवनावश्यक किराणा
कडा – टाळेबंदीत हातावरचं पोट असणा-या गोरगरीब मजूरांची उपासमार होऊ नये, म्हणून कड्याचे भूमीपुत्र शिवाजी कर्डीले यांनी वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देऊन एकावन्न गरजूंना जीवनावश्यक किराणा वाटून ख-या अर्थाने माणूसकीचा धर्म जपला आहे.
कोरोना सारख्या महामारीच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी राज्यात मागील दीड महिन्यांपासून टाळेबंदी करण्यात आलेली आहे. महिनाभरापासून हाताला कामधंदा नसल्याने मजूरांचे दैनंदीन जनजीवन अक्षरश: विस्कळीत झाले. त्यामुळे अशा गरिबांची या परिस्थितीत उपासमार होऊ नये. याकरिता अनेकजण मदतीचा हात पुढे करीत असतानाच, कड्याचे भूमीपुत्र शिवाजी कर्डीले गरजूंच्या मदतीला धावले आहेत. आपल्या वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळून त्यांनी माणूस म्हणून माणसांकडे पाहिले.
ग्रामपंचायत सफाई कामगारांसह पन्नासहून अधिक निराधारांना पंधरा दिवसांचा जीवनावश्यक वस्तूंचा किराणा वाटप करुन आदर्श पायंडा घातला आहे. ग्रामपंचायत कार्यालयात सामाजिक अंतराचे पालन करुन पदाधिका-यांच्या हस्ते गरजूंना किराणाचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शिवाजी कर्डीले यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.