Shevgaon : औरंगाबाद दुर्घटनेत मयत मजूरांच्या कुटूंबियांना २० लाखाची मदत मिळावी – कम्युनिस्ट पक्षाची मागणी

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

शेवगाव – राज्यातील औरंगाबाद दुर्घटनेत सोळा मयत मजुरांच्या कुटूंबियांना प्रत्येकी वीस लाख रूपयांची मदत केंद्र व राज्य सरकारने द्यावी तसेच सर्व स्थलांतरीत मजूर व पायी निघालेले मजूर यांच्या योग्य त्या तपासण्या करून सरसकट, विनाशर्त व  विनामोबदला मिळेल त्या साधनाने; त्यांच्या गावी पोहचवण्यासाठी व्यवस्था सरकारने करावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य सचिव मंडळाने केली आहे, अशी माहिती पक्षाचे राज्य सहसचिव अॅड. सुभाष लांडे यांनी दिली.

अॅड. लांडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे औरंगाबाद येथील दुर्घटनेतील सोळा मजूरांचा मृत्यू हे केंद्र व राज्य सरकारच्या ढिसाळ व गलथान नियोजनाचे बळी आहेत. या दुर्घटनेबद्दल भारतीय कम्युनिस्ट पक्ष अंत्यत दुःख व्यक्त करीत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पहिला २५ मार्चपासूनचा लॉकडाऊन सुरू झाल्यापासून स्थलांतरीत मजूर त्यांच्या गावी जाण्यासाठी शासनाकडे विनवणी करित आहेत. प्रवासाची कुठलीही सोय होत नाही, असे बघून हजारो मजूर मिळेल त्या वहानाने निघाले होते. परंतु रस्त्यावर ठिकठिकाणी अडवून कारवाई व केसेस होत असल्याने हे मजूर शेकडो किलोमीटर छोट्या मुलाबाळांसह तर ८० ते ९० वर्षे वयाच्या वृद्धांसह पायी निघालेले असून अनेकांचा यात मृत्यू ओढावला आहे.
शासनाने या मजूरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी घोषणा केली असली तरी काही प्रमाणात सुरू असलेली अंमलबजावणी अंत्यत तोकडी व अनेक अटी शर्ती व वेळकाढूपणाची आहे. परिणामी लोक पायीच गावी निघाले आहेत. अशाच प्रकारे पायी निघालेल्या लोकांचा औरंगाबाद येथे मालवाहू रेल्वेखाली येऊन 16 मजूरांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेबद्दल भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्रात राज्य सचिव मंडळ तीव्र दुःख व्यक्त करित असून केंद्र व राज्य शासनाने या मजूरांच्या कुटूंबीयांना वीस लाख रू प्रत्येकी मदत द्यावी. तसेच सर्व स्थलांतरीत मजूरांना योग्य त्या तपासण्या करून सरसकट विनाशर्त विनामोबदला मिळेल त्या साधनाने त्यांच्या गावी पोहचवण्यासाठी व्यवस्था करावी, अशी मागणी पक्षाने केली असल्याचे ऍड. लांडे यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here