शहरी भागासाठी पोलीस आयुक्तालय ग्रामीण भागात तहसीलदार किंवा जिल्हाधिका-यांकडे अर्ज करावे
वैय्यक्तिक प्रवास करणा-यांसाठी सोमवार पासून एसटीचे पोर्टल सुरू
कंटेन्मेंट झोनमध्ये परवानगी नसणार
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

राज्यात ठिकठिकाणी अडकलेल्यांना त्यांच्या मूळ गावी परतण्यासाठी मोफत एसटी बस सोडण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. ही सेवा फक्त 18 मे पर्यंत देण्यात येणार आहे. सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईन.
शहरी भागातील नागरिकांनी पोलीस आयुक्तालय तर ग्रामीण भागातील नागरिकांनी जिल्हाधिकारी किंवा तहसीलदारांकडे अर्ज द्यायचा आहे. एकाच ठिकाणी प्रवास करू इच्छिणा-या 20 ते 22 जणांनी आपले नाव, पत्ता, इच्छित स्थळ, आधारकार्ड, अशी माहिती भरून अर्ज द्यायचा आहे. अर्ज प्राप्त झाल्यावर बस कोठून मिळेल याची माहिती अर्जदारांना मोबाईलवर मिळणार आहे.
तर ज्या लोकांचा समूह नाही आणि त्यांना वैयक्तिक प्रवास करायचा आहे. अशा नागरिकांसाठी एसटी महामंडळामार्फत पोर्टल सुरू करण्यात आले असून सोमवारपासून हे पोर्टल खुले होईन, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.
दरम्यान, यामुळे कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून कडक नियम पाळण्यात येणार आहे, असे परब यांनी सांगितले. प्रत्येकाला मास्क अनिवार्य आहे. तसेच बसमध्ये चढण्यापूर्वी सॅनिटायझरने हात निर्जंतूक करण्याची काळजी घेण्यात येणार आहे. एका बसमध्ये 20 ते 25 प्रवासीच असणार आहेत, असे परब म्हणाले.