Beed: पोलीस चेकपोस्ट चुकवून आलेल्या सहाजणांवर गुन्हा दाखल

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कडा – जिल्हा प्रवेश बंदी असतानाही आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथे बाहेरगावी असलेले सहा कामगार विनापरवाना छुप्या मार्गाने व चेकपोस्ट चुकवून आणि कसलीही वैद्यकीय तपासणी न करता गावात आल्याने त्यांच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्वांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना क्वारंटाईन करण्यात आल्याचे पोलिस सुत्रांकडून सांगण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने जिल्हाप्रवेश बंदी केली आहे. शासनाची रितसर परवानगी घेऊन व वैद्यकीय तपासणी करून प्रवेश करता येतो. परंतु आष्टी तालुक्यातील टाकळी (अमिया) येथील सहा हमाल श्रीरामपूर येथील अशोकनगर सहकारी साखर कारखान्यावर हमाली करण्यासाठी गेले होते. परत गांवी येताना त्यांनी त्या कारखान्याची रितसर परवानगी घेतली नाही. तसेच वैद्यकीय तपासणी केली नाही. आणि टाकळी गावाकडे येताना सर्व चेकपोस्ट चुकवून छुप्या मार्गाने गावात प्रवेश करुन घरात कुटुंबासमवेत राहू लागले.

याप्रकरणी  जिल्हाबंदी आदेशाचे उल्लंघन करुन बीड जिल्ह्यात प्रवेश केला. गावातील इतर लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. या कारणांमुळे ग्रामसेविका नाईक यांच्या फिर्यादीवरून टाकळी अमिया येथील एका वस्तीवरील सहा जणांवर कलम १८८, २६९,२७० भादंवी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक बाबासाहेब गर्जे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here