प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री दि ११
कर्जत : कोरोनाच्या लॉकडाऊन काळात अनेक सर्वसामान्य आणि गरजवंत कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, फळे यासह विविध वस्तूंचे वाटप भास्कर भैलुमे मित्रमंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते भास्कर भैलुमे यांनी केले होते. तसेच अनुसुचित जाती-जमातीचा पंधरा टक्के निधी इतर विकासकामांना वापरण्याऐवजी सध्या कोरोनाने रोजगार आणि मजुरीविना असणाऱ्या गरजवंत कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूसाठी वापरण्यात यावा. त्यास प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद सर्व ग्रामपंचायतींना वाटप करण्याचे आदेश दिले होते. याच त्यांच्या सामाजिक कामाची दखल घेत सोमवारी राशीन येथील आंबेडकर चळवळीचे जेष्ठ नेते महेंद्र हिरवे आणि त्यांच्या पत्नी अंजली हिरवे यांनी भास्कर भैलुमे यांना चक्क स्वता:ची चारचाकी गाडी भेट देत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात, राज्यात आणि अहमदनगर जिल्ह्यात सर्वत्र लॉकडाऊन पाळावा लागला. कर्जत शहर आणि तालुक्यात सुद्धा या लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवसाय आणि दुकाने बंद करण्याची नामुष्की प्रत्येकावर आली. या काळात हातावर मजुरी असणाऱ्या कुटुंबाची मोठी परवड उभी राहिली होती. मात्र, शहर आणि तालुक्यातील अनेक सामाजिक संघटना आणि समाजसेवक यांनी जीवणावश्यक किराणा, भाजीपाला, फळे यांचे वाटप स्वता पदरमोड करत गरजवंत आणि मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाना मोठा दिलासा दिला होता. यात अग्रगण्य सहभाग होता तो भास्कर भैलुमे मित्रमंडळचे अध्यक्ष भास्कर भैलुमे यांचा.
भैलुमे यांनी प्रभाग क्रमांक १४ आणि १७ मधील सर्वच कुटुंबाना जीवणावश्यक वस्तुसह किराणा किटचे वाटप केले होते. यासह महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत संचारबंदी आणि लॉकडाऊन काळात सोशल डिस्टिंगचे नियम पुरेपूर पाळत मदत कार्य सुरू ठेवले होते. नुकतेच कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचे लक्ष वेधत शासन स्तरावरील अनुसुचित जाती-जमातीचा पंधरा टक्के निधी इतर विकासकामांना वापरण्याऐवजी सध्या कोरोनाने रोजगार आणि मजुरीविना असणाऱ्या गरजवंत कुटुंबाना जीवणावश्यक वस्तूसाठी वापरण्यात यावा असे निवेदन दिले होते.
त्यास प्रशासनाने तात्काळ सकारात्मक प्रतिसाद सर्व ग्रामपंचायतीना वाटप करण्याचे आदेश दिल्याने वरील समाजातील लोकांना मोठा आधार आणि दिलासा मिळाला होता. एका सर्वसामान्य आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्याचे समाजकार्याची पद्धत आणि तडफ पाहता राशीन येथील आंबेडकर चळवळीचे जेष्ठ नेते महेंद्र हिरवे आणि त्यांच्या पत्नी अंजली हिरवे यांनी भास्कर भैलुमे यांना चक्क स्वताची चारचाकी झायलो गाडी भेट दिली.
यावेळी भास्कर भैलुमे यांनी वाहनाची चावी घेताना आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, सामाजिक काम करताना झेंडा जरी कोणत्याही पक्षाचा असला तरी दांडा मात्र कायम आंबेडकरी विचारांचाच राहील. आज हिरवे दाम्पत्याने जो माझ्यावर विश्वास टाकून मला आंबेडकरी चळवळ गतीमान करण्यासाठी वाहन भेट देत गती दिली. ती निश्चित प्रेरणादायी राहील.
यापुढे समाजातील तळागाळातील लोकांच्या प्रश्नासाठी मोठी जबाबदारी वाढली असल्याचे सांगत हिरवे कुटूंबियाचे आभार मानले. याप्रसंगी माजी सरपंच रामकिसन साळवे, भाऊसाहेब तोरडमल, अनुराग भैलुमे, विजय साळवे, निलेश भैलुमे, संतोष आखाडे, किशोर कांबळे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.