Rahuri : राहुरीत केमिकलयुक्त दारुची विक्री…

0

पांगरमलची पुनरावृत्ती झाल्यावरच प्रशासनास जाग येणार का?

प्रतिनिधी | राजेंद्र उंडे | राहुरी

राहुरी – देशभरात लॉकडाऊन सुरु असतानाही राहुरी तालुक्यातील अनेक गावागावांत सर्रास देशी व विदेशी दारु चढ्या दराने विक्री सुरु आहेच. तालुक्यात सध्या कुकाणा व श्रीरामपूर येथून निर्मित होणारी केमिकलयुक्त देशी व विदेशी दारु सर्रास विक्री होत असताना. प्रशासनाची निष्क्रियता चव्हाट्यावर आली आहे.केमिकलयुक्त दारुच्या सेवनातुन पांगरमलची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

राहुरी तालुका हा अवैध व्यवसायात पूर्वीपासून अग्रेसर आहे.तालुक्यातील प्रवरा व मुळा नदीकाठी दारुच्या भट्ट्या  आजही सुरु आहेत. लाँकडाऊन काळातही सरमाडी (गावठी) दारु काढण्यासाठी लागणारे साहित्य संबधित दुकानदाराकडून पोहच सेवा केली जाते.देवळाली प्रवरा ,ब्राम्हणी, चेडगाव, मोकळओहळ, वांबोरी, बारगाव नांदुर, देसवंडी, टाकळीमिया, केंदळ,मानोरी, मांजरी, सोनगाव, कोल्हार,कोपरे आदी भागात सरमाडी (गावठी) अवैध दारु निर्मिती आणि विक्रीचे आगार बनले आहे.बांबोरी, देवळाली प्रवरा,टाकळीमिया ,केंदळ आदी भागात तर केमिकलयुक्त पावडरचा वापर करुन ‘सरमाडी’ (गावठी) बनावट दारु तयार करुन विक्री केली जात असल्याचे खुद्द हि दारु पिणाऱ्या काही व्यक्तींनीच सांगितले आहे.

केमिकलयुक्त विषारी पदार्थापासून श्रीरामपूर, कुकाणा, पांढरीपूल आदी भागात बनावट विदेशी (इंग्लिश) दारु निर्मितीचे केंद्र म्हणून पुढे येत आहे. केमिकलपासून तयार करण्यात येणारी दारु पाहिजे ब्रँडमध्ये विकली जाते. दारु एकच फक्त लेबल बदलले जात आहे. हे रॅकेट आता राहुरी तालुक्यात पोहचले आहे. व्यसनी झालेल्या मद्यपींना हीच दारु लाँकडाऊनच्या पदराआडून चौपट दराने विकली जात आहे. दारुविक्रीसाठी दुकानदारांची नामी शक्कल लढविण्यात येत आहे. नियमित ग्राहकांनी मोबाईलवर आपली ऑर्डर द्यायची विक्रीच्या ठिकाणापासून काही अंतरावर थांबलेल्या ग्राहकाकडून आधी चौपट दराने पैसे घ्यायचे नंतर दारुच्या बाटल्या हातात द्यायच्या. लॉकडाऊन पूर्वी दारुच्या किंमती व नंतरच्या किमंती चौपट दराने वाढल्या आहेत.

150 रुपयांची बियर सध्या 550 रुपयांना, मॅकडॉल 150 रुपयांची 600 रुपये, आय.बी. 140 रुपयांची 560 रुपये, एम.बी. 130 रुपयांची 530 रुपये, देशी 55 रुपयांची 250 रुपये, सरमाडी  (गावठी) 50 रुपयास एक लिटरची बाटली. 250 रुपयास विकली जात आहे. यात बहुतांश ठिकाणी केमिकलयुक्त दारुची विक्री केली जात आहे. पैसे नामांकीत कंपन्यांच्या दारुचे घ्यायचे माञ दारु देताना केमिकलयुक्त बनावट दारु द्यायची. बनावट केमिकलयुक्त दारु श्रीरामपूर, कुकाणा, पांढरीपूल आदी ठिकाणी तयार केली जाते.

एकच दारु फक्त बाटली बदलायची असा धंदा तेजीत चालू आहे. लॉकडाऊन काळात प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. या काळात राञी सरमाडी (गावठी) व केमिकलयुक्त दारुची वाहतूक करणारी वाहने पकडण्यात आली. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करण्या ऐवजी बिनधास्त सोडून देण्यात येत होते. या मागील राजकारणही महत्वाचे आहे. स्थानिक पोलिसांना महिना बांधून दिलेला असल्याने कारवाई करण्याचे टाळले जात होते. केमिकलयुक्त दारु कोण पुरवठा करतो, कोण विक्री करतो याची पूर्ण कल्पना पोलिसांना असतानाही केवळ हप्त्यासाठी पोलिस कारवाई करण्याचे टाळत असले तरी पांगरमलची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ज्या त्या भागात केमिकलयुक्त दारु निर्मिती करणारे कोन याची माहिती पोलिसांना असतानाही याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला जातो. केमिकलयुक्त दारुचा अनेकांना ञास होत आहे. परंतू व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तींना बनावट तर बनावट तात्पूर्ती नशा भागवण्याचे काम केले जात आहे. केमिकलयूक्त दारुतून  नगर जिल्ह्यातील पांगरमलची पुनरावृत्ती झाल्यावरच पोलिस प्रशासन जागे होणार आहे का?

राज्य उत्पादन शुल्क नेमके काय करते ?  

जिल्ह्यात अवैध व्यवसायांना ऊत आला आहे. त्यात दारु आणि गुटखा, मावा विक्री सुरु असताना उत्पादन शुल्क विभाग, अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक पोलिस प्रशासन यांचे याकडे होणारे दुर्लक्ष हा चर्चेचा विषय ठरला आहे. नगरचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक कारवाई करुन जाते. माञ, स्थानिक पोलिसांना अवैध धंद्याचे अड्डे दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. काही दिवसापूर्वी राहुरी कारखाना येथे छापा टाकण्यासाठी आलेल्या एका अधिकाऱ्याची गुटखा व्यापाऱ्याने ‘ओटी’ भरल्याने या मागील रहस्य खूप काही सांगून जाते.

केमिकलयुक्त दारुने पोटदुखी

राहुरी तालुक्यातील एका राजकीय पदाधिकाऱ्याला केमिकलयुक्त दारु चांगलीच महागात पडली. गेल्या आठवड्यात राजकिय पदाधिकाऱ्याने पैज लावून आपल्या मिञांसमवेत पार्टी केली. पार्टीत केमिकलयुक्त दारु पोटात रिचवली   केमिकलयुक्त दारुने केमिकलचा करिष्मा दाखवला संबंधित राजकीय पदाधिकाऱ्यास व मिञास पोटदुखी आणि उलट्याचा ञास  झाला. तीन हजाराची केमिकलयुक्त दारु वीस हजारास पडली. या राजकिय पदाधिकाऱ्याने पोलिस निरीक्षक यांच्याकडे तोंडी तक्रार केली. त्यावेळी पोलिस निरीक्षक यांनी पुन्हा केमिकलयुक्त दारु पिऊ नका नामांकीत कंपनीची दारु घेत जा, असा सल्ला दिला. परंतू तोंडी तक्रारीची दखल घेऊन केमिकलयुक्त दारु विक्रेत्यावर माञ  कारवाई केलीच नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here