प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
राहाता – शहरात श्रीरामपूरच्या गुन्हेगारांनी गोळीबार केल्याची घटना राहाता शहरात घडली असून. यातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर दोघेजण फरार झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी राहाता येथील गोदावरी कालव्यावरील पत्री पुलाजवळ वैभव ताठे या तरुणास, या तीन आरोपींनी मारहाण करून त्याच्याकडील सहा हजार रुपये बळजबरीने चोरून नेल्याची घटना घडली होती. सदर आरोपी शुक्रवारी (दि.15) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास याच परिसरात पल्सर मोटार सायकलवर फिरताना, वैभव ताठे यास दिसून आले. ताठे याने याबाबतची माहिती आपल्या भावाला आणि सहकार्यांना दिली. त्यांनतर संबंधित सहकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने मदतीला धावून आले.
त्यांनी आरोपीला घेरले असता, पल्सर मोटारसायकलवर असलेल्या तीन आरोपींनी मोटारसायकल तेथेच टाकून बाजूच्या शेतामध्ये पळ काढला. तेथील नागरिकांनी पाठलाग केला. यावेळी आरोपीतील एकाने त्याच्या जवळील गावठी कट्ट्यातून जमावाच्या दिशेने गोळीबार केला. तर पळत असताना यातील हातात कोयता असलेला आरोपी शेतातील बांधाला पाय अडकून पडल्याने नागरिकांच्या तावडीत सापडला. तर दोघे आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. पकडलेल्या आरोपीला जमावाने बेदम मारहाण केली आणि राहाता पोलिसनां घटनेची माहिती दिली.
राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये, सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रशांत कंडारे यांनी तातडीने आपल्या सहकाऱ्यांसह 1घटनास्थळी धाव घेतली आणि जमावाने पकडलेल्या आरोपीस ताब्यात घेत दोघा फरार आरोपींचा नागरिकांसह परिसरात शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधाराचा फायदा घेत ते दोघे आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.
घटनेची माहिती काळताच श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली तर तपसाबाबत सूचना केल्या आहेत. यातील एका आरोपीस राहाता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्या विरोधात वैभव ताठे याच्या फिर्यादीवरून जबरी चोरी आणि आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास राहाता पोलीस करत आहेत.