प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
राहुरी – येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन पोलिस कर्मचा-यांमध्ये कलेक्शन करण्याच्या कारणावरून दगड गोट्याने जबरदस्त हाणामारी झाली. सदर घटना दि. १५ मे रोजी घडली असून वरीष्ठ पोलिस अधिका-यांनी कलेक्शन करणा-या दोन्ही कर्मच-यांची समजूत काढून सदर प्रकरणावर तूर्तास पडदा टाकला आहे. मात्र भविष्यात सदर वादाचे रूपांतर मोठ्या गुन्ह्यात होण्याची शक्यता असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.
सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यासह राहुरी तालुक्यात लाॅकडाऊन सुरू आहे. मात्र, तालुक्यातील अवैध व्यवसायांना कोणत्याही प्रकारचे लाॅकडाऊन नाही. पोलिस प्रशासनाच्या आशिर्वादाने दारू धंदे, गुटखा विक्री, चोरटी वाळू वाहतूक या सारखे अवैध व्यवसाय तालुक्यात राजरोसपणे सुरु आहेत. सदर अवैध व्यवसाय चालू ठेवण्यासाठी अधिका-यांनी तालूक्यात तीन पोलिस कर्मचारी अवैध धंद्याचे कलेक्शन करण्यासाठी कलेक्टर म्हणून नेमले आहेत. यापैकी एका कलेक्टरकडे वळण परिसर व ट्राफिकचे कलेक्शन करण्याची जबाबदारी होती.
तसेच आरडगांव बिटातील दोन कलेक्टरकडे वळण परिसर व ट्राफिक वगळता सर्वच ठिकाणचे कलेक्शन करण्याची जबाबदारी होती. संपूर्ण राहुरी तालुक्यातील अवैध धंद्यांचे कलेक्शन करण्याची महत्वाची जबाबदारी या तीन कलेक्टरवर होती. मात्र काही दिवसांपासून तालुक्यातील इतर ठिकाणचे कलेक्शन करणारे आरडगांव बिटातील दोन कलेक्टर ट्राफिक आणि वळण परिसरात जाऊन कलेक्शन करू लागले. याच कारणावरून तिन्ही कलेक्टरांमध्ये वाद निर्माण झाला होता. त्यामुळे कलेक्शन करणारे कलेक्टर बदलण्यात आले. याच गोष्टीची खुमखुम तिन्ही कलेक्टरांच्या मनामध्ये होती. अनेक वेळा त्यांच्यात छोटे मोठे वाद निर्माण झाले होते.
मात्र, दिनांक १५ मे रोजी रात्री आठ वाजे दरम्यान नगर मनमाड राज्य महामार्गावरील तुतारी मिसळ या हाॅटेल समोर कलेक्शन करणारे दोन कलेक्टर समोरा समोर आले. सुरुवातीला शाब्दीक वाद निर्माण झाला. नंतर हाणामारी सुरू झाली. यावेळी यातील एका कलेक्टरने रस्त्यावरील भला मोठा दगड उचलून दुस-या कलेक्टरच्या पाठीत मारला. दोन्ही कलेक्टरमध्ये सिने स्टाईल हाणामारी झाली. यावेळी इतर काही पोलिस कर्मचार्यांनी सदर हाणामारी सोडविली. यावेळी शहरातील इतर नागरिकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली.
पोलिस कर्मचा-यांमधील अंतर्गत वाद म्हणून कोणीही हाणामारी सोडविण्यासाठी पुढे आले नाही. यावेळी एका वरीष्ठ अधिका-यांनी तिन्ही कलेक्टरांमध्ये सुरू असलेला वाद तूर्तास मिटवीला आहे. तसेच पुन्हा पूर्वी प्रमाणेच कलेक्शन करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशी शहरामध्ये चर्चा सुरू आहे. कलेक्शन करणारे ते तिन कलेक्टर कोण? कलेक्शन करून जमा झालेली सर्व रक्कम कोठे जाती? कलेक्शनच्या कारणावरून भविष्यात काही मोठा गुन्हा झाला, तर याला जबाबदार कोण? जिल्हा पोलिस प्रमुख या घटने बाबत काय भूमिका घेणार? राहुरी तालुक्यातील अवैध धंदे बंद होणार कि चालूच राहणार? असे अनेक प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केले जात आहे. सदर घटना खरी आहे कि खोटी आहे. याबाबत जिल्हा पोलिस प्रमुख यांनी चौकशी करून कारवाई करावी. अशी मागणी सामान्य नागरिकांमधून केली जात आहे.