बाधित रुग्ण मूळचे नगर जिल्ह्यातील…
शितलकुमार जाधव । राष्ट्र सह्याद्री
बीड: जिल्ह्यातील माजलगाव व गेवराई तालुक्यात 16 मे रोजी कोरोनाचे दोन रुग्ण आढळले असताना आज दिनांक 17 रोजी आष्टी तालुक्यात एकाच कुटुंबात सात कोरोनाचे रुग्ण आढळले. संबंधित रुग्ण दिनांक 13 मे रोजी मुंबईहून आपल्या नातेवाईकाकडे आष्टी तालुक्यातील सांगवी पठाण या गावी आले होते. या सर्वांची तपासणी केली असता हे सर्वजण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. 66, 65, 45, 38, 10 व 6 वयोगटातील हे रुग्ण असून यामध्ये पाच पुरुष व दोन महिला आहेत.
संबंधित रुग्ण मुंबईहून आपल्या नातेवाईकाकडे आले असून ते पिंपळगाव खुडा, तालुका अहमदनगर येथील रहिवासी आहेत. बीड जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे रुग्ण आढळून आले नव्हते. मात्र चौथे लॉक डाउन सुरू होताना बीड जिल्ह्याची चिंता वाढली आहे. नागरिकांनी सामाजिक अंतर पाळावे, प्रवास टाळावा तसेच आपल्या परिसरात संशयित रुग्ण असल्यास त्याची माहिती प्रशासनाला कळवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.