अजून परभणीपर्यंत पुढील प्रवास; प्रशासनाकडून वाहनाच्या मदतीची अपेक्षा
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री | शितलकुमार जाधव

बीड – आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संचारबंदी चालू असताना हजारो कामगार मजदूर आपल्या गावाकडे पलायन करत असताना दिसत आहेत. आपआपल्या परीने व जशी मदत मिळेल त्या पद्धतीने मजूर व कामगार आपल्या गावाकडे जाताना आपल्याला दिसत आहेत. आज बीडमध्ये दोन जोडपे व एक लहान मुलगा चाकण येथून हात गाड्यावर प्रवास करीत दाखल झाल्याचे दिसून आले.
त्यांच्याशी संवाद साधला असता, हे दोन्ही कुटुंब चाकण येथून आपल्या गावाकडे पायी प्रवासाला निघाले असून आज सोमवारी (दि. 18) नऊ दिवसांचा प्रवास करीत बीड येथे दाखल झाले. ऊन, वारा, पाऊस यांचा सामना करत ते आपले गाव जवळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यासोबत एक हात गाडी एक लहान मुलगा त्यातील एक जोडपे परभणी येथे जाणार असून एक जोडपे अंबाजोगाई तालुक्यातील पुसद येथे जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
आतापर्यंतच्या प्रवासात अनेक ठिकाणी लोकांनी त्यांना चांगल्या प्रकारे मदत केली. कोणी भोजनाची व्यवस्था केली तर कोणी आर्थिक सहकार्य केले. पोलिसांचीही काही वेळा मदत मिळाली. मात्र, यांची अद्यापही थर्मल तपासणी झाली नाही.
लोकांची मदत मिळते प्रशासन मात्र या परिस्थितीवर गप्प आहे. कामगार मजुरांना आपल्या गावाकडे जाण्यासाठी प्रशासनाकडून मदत मिळणे अपेक्षित आहे. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळत नाही. अंबाजोगाई तालुक्यातील पूसद या गावचे एक जोडपे असून त्यांना तीन ते चार दिवस लागण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले. असे असताना प्रशासनाने मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे. अशा मजदूर कामगारांसाठी प्रशासनाकडून वाहनांची सुविधा मिळावी, अशी माफक अपेक्षा त्यांनी राष्ट्र सह्याद्रीच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली.