Newasa : ‘त्या’ अपघाती जागेवर सुरक्षेचे उपाययोजना करण्याचे कार्यकारी अभियंत्यांचे आदेश

0
प्रतिनिधी| राष्ट्र सह्याद्री 
नेवासा फाटा – येथे कायम अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या रस्ता दुभाजकाच्या जागेवर दुर्घटना टाळण्यासंदर्भात सुरक्षेचे तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभाग (जागतिक बँक प्रकल्प)चे कार्यकारी उपअभियंता एस. वाय. औटी यांनी वडाळा बहिरोबा ते औरंगाबाद महामार्गाची ठेकेदार कंपनी असलेल्या के.टी. संगम इन्फ्रास्ट्रकचरला दिले आहेत. अहमदनगर जिल्हा काँग्रेसच्या एस.सी. विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष कमलेश गायकवाड यांनी केलेल्या पाठपुराव्याचे हे यश असल्याचे मानले जाते. 
नेवासा फाटा येथील रस्ता दुभाजक असलेला हा भाग नेहमीच अपघाताला निमंत्रण देणारा ठरला आहे. पुढे दुभाजक सुरू होणार असल्याबाबत या रस्त्याच्या ठेकेदार कंपनीने तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने कुठलाही सूचना देणारा फलक अथवा सुरक्षेचे उपाय योजिलेले नसल्याने अपघाताची अखंड मालिकाच येथे सुरू आहे. या ठिकाणी झालेल्या अपघातात मोठ्या प्रमाणावर जीवित तसेच वित्त हानी झाल्याची असंख्य उदाहरणे आहेत. तर अनेकांना कायमचे अपंगत्वही आलेले आहे.
या ठिकाणी सुरक्षेचे ठोस उपाययोजना करून सुरू असलेली जीवित व वित्त हानीची मालिका रोखावी यासाठी विविध राजकीय-सामाजिक संस्था, संघटनांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी सर्व संबंधितांकडे मागणी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने या जागेवर अपघातांचे सत्र सुरूच होते. काही दिवसांपूर्वी पुण्याहून उत्तर भारतात परप्रांतीय कामगारांना सोडण्यासाठी घेऊन जाणाऱ्या बसला या ठिकाणी भीषण अपघात घडला. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही. परंतु चार कामगार गंभीर जखमी होऊन बसचेही मोठे नुकसान झाले होते.
जिल्हा काँग्रेसच्या एस.सी. विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष कमलेश गायकवाड यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना लेखी निवेदन देऊन या समस्येकडे त्यांचे लक्ष वेधले. थेट मंत्रालय पातळीवरून गंभीर दखल घेतली गेल्याने वेगाने चक्रे फिरून सार्वजनिक बांधकाम विभाग (जागतिक बँक प्रकल्प)च्या उपकार्यकारी अभियंता एस.वाय. औटी यांनी या रस्त्याच्या ठेकेदार कंपनीला सुरक्षेचे उपाययोजना करण्यासंदर्भात लेखी आदेश देऊन तंबी दिल्याने तालुक्यात समाधान व्यक्त केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here