Kada : बांधावर खत वाटप” योजनेचा लाभ घ्यावा – राजेंद्र सुपेकर

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कडा – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी दुकानात गर्दी होऊ नये, म्हणून सरकारने थेट बांधावर खत वाटप योजना कार्यान्वित करण्यात आली असून शेतक-यांनी गटाद्वारे खताची मागणी करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आष्टीचे कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी पत्रकाव्दारे केले आहे. 
यावर्षी पावसाळा उंबरठ्यावर असल्यामुळे शेतक-यांची लगबग वाढली असून खरीपाच्या पेरणीसाठी बी- बियाणे, रासायनिक खतांची जुळवणी होऊ लागली आहे. दरम्यान कृषी सेवा दुकानात खरेदीसाठी होणा-या गर्दीमुळे कोरोना विषाणूचा धोका उदभवण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने थेट बांधावर खते व बी -बियाणे वाटप करण्याची योजना सुरु केली आहे. याचा लाभ घेण्यासाठी शेतक-यानी एक गट तयार करुन त्या गटप्रमुखाकडे पैसे जमा करावेत.
गटप्रमुखाने कृषी दुकानदाराकडे पैसे जमा केल्यानंतर शेतकरी, कृषी दुकानदार व गटप्रमुख यांच्या समन्वयातून बांधावर खत वाटप होईल. या योजनेमुळे कोरोनाचा धोका टळणार आहे. राज्य सरकारच्या निर्धारित दरातच शेतक-यांना टप्प्या-टप्प्याने खत उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतक-यांनी खते, बियाण्यांचा साठा करुन ठेवण्याची गरज नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे बांधावर खत योजनेचा अधिक शेतक-यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी अधिकारी सुपेकर यांनी केले आहे.
“निर्धारित दरापेक्षा अधिक पैसे घेतल्यास कारवाई “
कोरोनाच्या संकटात एखादा कृषी दुकानदार  खते, बी-बियाण्यांची विक्री करताना निर्धारित दरापेक्षा अधिक पैसे घेऊन शेतक-यांची अडवणूक करीत असल्यास संबंधितांनी त्या कृषी दुकानदाराची कृषी कार्यालयाकडे तक्रार करावी, विशेष म्हणजे तक्रार कर्त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असल्याचे कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर याांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here